Pathardi Crime : तालुक्यातील माणिकदौडी येथे आढळला महिला व पुरुषाचा मृतदेह 

0

विवाहबाह्य संबंधातून दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौडी येथील बोरसेवाडी फाटा येथे अज्ञात महिला (वय अंदाजे ३५) व पुरुषाचे (वय अंदाजे ४०) मयत अवस्थेत आज (गुरुवारी) सकाळी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अद्यापपर्यंत ओळख पटली नाही. घटनेची माहिती कळताच त्या बिटचे हवालदार रांजणे व पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके यांनी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील भाडेकरु आणि घरमालकाच्या पत्नीचा मृतदेह आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विवाहबाह्य संबंधातून दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
माणिकदौडी परिसरात बोरसेवाडी गावाजवळ हा प्रकार घडला. महिला आणि पुरुष अशा दोघांचे मृतदेह सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास आढळले होते. रस्त्याच्या कडेला बाईक पार्क केलेली होती, त्यापासून 100 मीटर अंतरावर मृतदेह सापडले. दोघांचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुरुषाकडील कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली. मोबाईलवर आलेल्या मिस कॉलवर संपर्क करुन त्यांच्या वडिलांना माहिती दिली.
मात्र, या पुरुषासह मृतावस्थेत सापडलेली महिला त्यांची सून नसल्याचे पोलिसांना समजले. तेव्हा अधिक चौकशी केली असता संबंधित महिला त्या पुरुषाच्या घरमालकाची पत्नी असल्याची माहिती मिळाली. बहिणीला भेटायला जामखेडला जाऊन येते, असे सांगून त्या निघाल्या होत्या. दोघेही औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील रहिवासी असून दोघेही विवाहित होते. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, एचसी रांजणे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here