Sangamner : हभप निवृत्ती महाराज देशमुख यांना 20 ऑगस्टपर्यंत दिलासा

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | विकास वाव्हळ 

प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायालयाच्या त्या हुकूमाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाने खालील कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणी दि. 20 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे. तोपर्यंत इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.

समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याची फिर्याद त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात दाखल झाली आहे. स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो. विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशुभ वेळेला झाला तर औलाद रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळविणारी होत असल्याचे विधान इंदोरीकर महाराज यांनी केले होते. या विधानाचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर झळकले होते. या विधानामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये 19 जून रोजी संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

त्यानुसार 3 जुलै रोजी संगमनेरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर कामकाज झाले होते. यावेळी सरकारी वकिलांनी, सरकारची बाजू मांडली होती. तसेच या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सांनी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. आजच्या आदेशाने 20 ऑगस्टपर्यंत इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here