कायद्यातील पळवाटांमुळे गुटखा बंदीचा  उडाला फज्जा

0
श्रीगोंदा : कायद्यातील पळवाटांमुळे गुटखा बंदीचा फज्जा उडाला असून सर्वत्र अवैध विक्री सर्रास सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत  लाखो रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केल्यामुळे शासनाची गुटखा बंदी खरंच आहे का? असा गंभीर प्रश्न कारवाईसंदर्भात उपस्थित झाला आहे.
श्रीगोंदा शहरासह ग्रामीण भागातील सर्वच पानटपऱ्यांवर गुटखा, सुगंधित तंबाखू आणि खर्ऱ्याची भरघोस विक्री सुरू आहे. ही विक्री अधिकारी आणि विक्रेत्यांचे संगनमत असल्याशिवाय शक्य नाही, असा ग्राहक संघटनांचा आरोप आहे. त्यामुळे या विभागाने थोडस गंभीर होण्याची गरज निर्माण झाली आहे
अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे श्रीगोदयात येणार असल्याची माहिती पान टपऱ्यांना आधीच सूचना मिळते त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात अन्न प्रशासनाच्या कारवाया म्हणजे थोतांड असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे
अन्न सुरक्षा व मानके कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद नसल्यामुळे विक्रेत्यांना कारवाईची भीती वाटत नाही. फौजदारी कायद्याप्रमाणे तरतूद असल्यास कुणीही विक्रेता गुटख्याची विक्री करण्यास धजावणार नाही. आतापर्यंत देशात एकूण २६ राज्यांनी गुटखा खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे. यासह सहा केंद्रशासित प्रदेशांमध्येही गुटखा विक्रीवर बंदी आहे. बंदीचा कायदा कडक करण्याची अनेक ग्राहक संघटनांनी केली आहे. यापूर्वी राज्यात बंदीचा कायदा अधिक कडक करण्याचे सूतोवाच अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केले होते. कायद्यात सुधारणा व त्यावर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास दंडात्मक व सक्तमजुरीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आहे.
सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवित महाराष्ट्रात लगतच्या राज्यातून गुटख्याची आवक सुरू आहे. बंदीचा लाभ घेत विक्रेत्यांनी गुटख्याची किंमत दुप्पट व तिपटीवर नेली आहे. गुटखा उत्पादनावर बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा कुठून येतो, हा गंभीर प्रश्न आहे. गुटखा खाणाऱ्यांना गुटखा विक्रीची ठिकाणे सापडतात, मात्र पोलिसांना किंवा अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही, हे कोडे कायम आहे. पोलिसांनीही स्वयंस्फूर्तीने अवैध विक्रेत्यांवर कारवाई करावी.  अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे गुटख्याची चोरट्या मार्गाने आयात होते आणि तो विकलाही जातो आहे, अशी माहिती ग्राहकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here