‘ती’ येते आणि जाते, जाताना ‘शॉक देते…

2

पाऊस आला की पोरासोरांनी ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ म्हणत भर पावसात बेभानपणे नाचण्यासारखं आनंददायी दृष्य नाही. त्यात वावगंही वाटत नाही. मात्र मान्सून आला आणि बरसला म्हणताच आपल्या राज्य शासनानं ‘पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा’ असं म्हणत नाचत सुटावं म्हणजे भलतंच. आता प्रत्यक्षात शासन नाचतांना दिसत नसलं तरी पावसाला सुरुवात होताच मुख्यमंत्री, उर्जामंत्री, उर्जा सचिव, महावितरण आदी सर्वजण मनातल्या मनात नाचू लागलेत हे मात्र खरंय! काय समजलं की नाही आम्ही काय म्हणतोय ते?
गेल्या काही वर्षापासून आपल्या राज्याच्या ऊर्जा खात्याची ‘उड-जा’ खातं अशी अवस्था झालीय. गेले चार-पाच वर्षे वीजेच्या वापराचा ‘भार’ इतका वाढलाय की हा ‘भार’ वीज मंडळच काय पण भल्या भल्या राज्यकर्तांनाही सोसवेना. शेवटी काय? एकच उपाय भारनियमन! भारनियमन शब्दात ‘भार’ असला तरी त्याचा इतका वापर झालाय की, या शब्दाचा कुणालाच ‘भार’ वाटत नाही! इतका हा शब्द गुळगुळीत होवून या शब्दाचं हसू झालंय. ‘अति झालं अन् हसू आलं’ अशा म्हणी काय उगीच जन्माला येतात? आठवडा, पंधरवाडा, महिना छे हो! वर्षभर भारनियमन! उर्जा विभागाच्या भारनियमनाच्या भारानं जनता अक्षरश: वाकलीय! विजेअभावी ‘सोसना भार घामाघूम झालं अंग’ अशी अवस्था झाली राव!
मला सांगा, माहेर जवळ आहे म्हणून बायको जर उठसूठ रोज माहेरला जायला लागली, तर कोणता दादला हे खपवून घेईल? कधी ना कधी तो बायकोचे लाड बंद करुन तिच्या झिंज्या खेचणारचं ना. विजेच्या बाबतीत असंच घउलं. शासन आपलं असलं म्हणून काय झालं हो, पण शासन जर सत्ता देणार्या जनतेलाच ‘शासन’ करायला लागलं तर जनता खवळणारच की. गेल्या काही दिवसांपासून आय मिन राज्यातल्या वर्षापासून विजेची अवस्था ‘ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं’ अशी आतुरतेची आणि उत्सुकतेची झालीय. ती एखाद्या कॉलेज कुमारी सारखी तरतरा येते आणि आली… आली… म्हणायच्या आत पसार होते! मग ताटकळत वाट बघणाराला घुस्सा येणारंच की! त्याचा पारा चढणारचं!
‘शॉक’ देवून ऊर्जा विभागाचे ‘फ्यूज’ उडवायचा प्रयत्न करुन पाहिलं पण नाही दया माया नाही. मायबाप सरकार ‘विजेचा तुटवडा आहे काय करणार?’ एवढ्याच सबबीची ‘आर्थिंग’ देत बसलं! काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं ‘थ्री फेज’ चं ‘पॉवरफूल’ सरकार असतानाही वीज निर्मितीची ‘आर्थिंग’ नसल्यानं सगळा इस्कोट झालाय!
ग्रामीण भागातील जनता काय हो, अल्लाची गाय! वर्षभर नव्हे तर दहा वर्षे भारनियमन केलं तरी हुं की चू करणार नाही. शासनावर ग्रामीण जनतेचं प्रेमच इतकं अतुट आहे की, ‘लैला-मजनू’ चीच आठवण व्हावी! पण ग्रामीण भागातील भारनियमनही पुरेसा ठरेना तेव्हा पुणे-मुंबई सारख्या शहरांनीही भारनियमन लागू करावं लागणार या चिंतेनं अवघं सरकार काळजीत पडलं! पुण्या-मुंबईस भारनियमन म्हटल्यावर एसी, फ्रीज, कुलर बंद होणार. रात्रभचा झगमगाट करणार्या दिव्यांची दिवाळी सरणार. बिचार्या शहरी जनतेला यातना सोसाव्या लागणार ह्या काळजीनं शासनाचं काळीज हेलवून गेलं. शासनास पुणे-मुंबई अशा शहरांच्या चिंतेनं ‘हार्ट अ‍ॅटॅक’ येण्याची चिनंहे दिसताच साक्षात इंद्र देवाला शासनाची किव आली. वाजत गाजत इंद्र देवाची स्वारी राज्याच्या दौर्यावर आली.
इंद्र देवाच्या कृपेने राज्यात गेल्या महिनाभरात भरपूर पाऊस झाला. आता विजेची मागणी घटणार. वीज सुरळीत होताच जनता जनार्दन झालं गेलं विसरुन जाणार आणि निवांत घोरत पडणार. जनतेला जाग येईल थेट पावसाळा संपल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने आणि दमाने भारनियमन सुरु होईल तेव्हा! सध्या कोणत्याही निवडणूका नसल्याने मायबाप सरकार निवांत आहे. तर हे असं आहे. पावसामुळं विजेचा प्रश्न सुटणार, तो देखील एकही मेगावॅट नवीन वीज निर्माण न करता! हा तो असुरी की अघोरी काय म्हणतात तो ‘शासकीय आनंद’ जनतेच्या वतीने आम्ही देखील शासनाच्या आनंदात सहभागी झालोत. भर पावसात नाचू लागलोत आणि गाऊ लागलोत! कारण ‘ती’ येते आणि जाते, पण जातांना ‘शॉक’ देते…
– भास्कर खंडागळे, बेलापूर, (9890845551)

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here