Editorial : आता पंजाबमध्ये दुही

काँग्रेसमुक्त भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीला काँग्रेसजणच हातभार लावीत आहेत. लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांत दोनदा दारूण पराभव होऊनही काँग्रेसजण सुधारायला तयार नाहीत. गटबाजीतून कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर ही राज्ये हातातून गेली. राजस्थानमध्ये ३२ दिवसांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर पडदा पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या अनेक घोडचुका आहेत. या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून काँग्रेसजणांना जनमत आपल्या बाजूने वळविण्यात अपयश आले आहे. सरकारविरोधात एकमताने जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविण्याऐवजी काँग्रेसजण आपआपसांतच भांडत बसले आहेत. त्यातून सत्ता जात असल्याचे भान त्यांना नाही.

मध्य प्रदेशानंतर राजस्थान आणि आता झारखंड तसेच पंजाबमधील काँग्रेसजण एकमेकांच्या विरोधात कुभांडे रचून त्यांना पक्षाबाहेर घालवायला लागले आहेत. त्यांच्या अशा स्पर्धामुळे आणि पक्षश्रेष्ठींच्या कुचकामी भूमिकेमुळे काँग्रेस दुबळी होत आहे, हे कुणाच्या लक्षात येत नाही. ज्यांच्यामागे संघटन आहे, जनमत आहे, ज्यांच्यात राज्यात सत्तापरिवर्तन करण्याची ताकद आहे, अशा लोकांचे पंख छाटण्याचे काम दरबारी राजकारण करणारे करतात आणि पक्षश्रेष्ठींची भिस्तही अशाच नेत्यांवर आहे. पंजाबमध्ये कॅ. अमरिंदर सिंग यांना मोकळा हात दिल्याने त्यांनी तेथील अकाली दल-भाजपची सत्ता घालवून तिथे पंजाला चांगला आधार दिला. निवडणुकीनंतर कॅ. सिंग यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले; परंतु नवज्योत सिद्धू कायम त्यांच्याविरोधात भूमिका घेत. त्यांना पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद होता. अखेर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा झटका बसला. त्यामुळे कॅ. सिंग यांच्याविरोधात आवाज उठविणा-यांसाठी एक निमित्त मिळाले; परंतु त्यातूनच अगोदर सिद्धू यांचे मंत्रिपद बदलले आणि नंतर त्यांनी राजीनामा दिला.

आता कोठे सिद्धू आणि कॅ. सिंग यांच्यात गूळपीठ जमत असताना दुस-या दोन खासदारांनी कॅ. सिंग आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जाखड यांच्याविरोधात मोहीम उघडली असून त्यांना हटविण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. या दोघांना हटविले नाही, तर आगामी सव्वातीन वर्षांत होणा-या निवडणुकीत काँग्रेस नामशेष होण्याचा इशारा दिला आहे. खासदार प्रतापसिंह बाजवा यांनी तर कॅ. सिंग यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशा कठोर शब्दांत त्यांचा पाणउतारा केला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांनीही कॅ.सिंग यांच्याविरोधात टीका केलेली नाही. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे अकाली दल आणि भाजपच्या हाती आयते कोलित मिळाले आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाचे राज्यसभा सदस्य प्रतापसिंह बाजवा यांचा रोष आणखीच वाढला आहे. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेल्या बाजवा यांनी कॅ. सिंग यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. कॅ. सिंग यांची सत्ता येण्यापूर्वी पंजाब अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्यावरून एक चित्रपटही निघाला. उडता पंजाबमुळे पंजाबची प्रतिमा मलीन होत असल्याची टीका साडेचार वर्षांपूर्वी झाली होती. पंजाबमधील वाढती व्यसनाधीनता आणि तेथील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर तर काँग्रेसला तिथे सत्ता मिळाली. असे असताना आता टाळेबंदीच्या काळात गावठी दारूने पंजाबमध्ये १२३ नागरिकांचे बळी घेतले. भाजप आणि अकाली दलाने काँग्रेस आणि कॅ. सिंग यांची कोंडी केली.

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कॅ. सिंग यांच्या सरकारने अनेक लोकांचे संरक्षण काढले. गावठी दारूकांडामुळे कॅ. सिंग संतापले असून त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांना कठोर शिक्षा करण्याचे आदेश दिले. काही पोलिसांची उचलबांगडी केली. बाजवा यांचेही संरक्षण कॅ. सिंग यांनी काढून घेतले. त्यांना केंद्रीय सुरक्षा दलाचे संरक्षण आहे. राज्याचेही संरक्षण त्यांना हवे आहे. त्यामुळे पोलिस संरक्षण मागे घेतल्याबद्दल बाजवा यांनी कॅ. सिंग आणि पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांना लक्ष्य केले आहे. बाजवा आणि काँग्रेस पंजाबमधील राज्यसभेचे अन्य सदस्य शमशेरसिंग दुलस यांनी गेल्या काही दिवसांपासून कॅ. सिंग यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली आहे. विषारी दारू प्यायल्याने 123 लोकांच्या मृत्यूमुळे ते पंजाबमधील तारणतारण, अमृतसर आणि गुरदासपूर या जिल्ह्यांमध्ये कॅ. सिंग यांच्यावर हल्ला करीत आहेत.

कॅ. सिंग आणि जाखर यांची पदे काढून घेण्याची मागणी या दोन खासदारांनी केली आहे. दोन्ही खासदारांनी कॅ. सिंग यांच्याविरोधात विषारी दारूच्या मुद्द्यावरून राज्यपालांना निवेदन दिले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड़ यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून या दोन्ही खासदारांना पक्षातून काढून टाकण्याची शिफारस केली. त्यानंतर बाजवा आणि दुल्हा यांनीही जाखड यांना लक्ष्य केले. कॅ. सिंग यांच्या विरोधात पंजाबमधील नव्वद टक्के आमदार नाराज आहेत आणि जर सिंग यांना काढून नवे मुख्यमंत्री केले नाहीत, तर पंजाबमध्ये काँग्रेसचा खेळ संपेल, असा इशारा त्या दोघांनी दिला आहे. एवढेच नाही, तर मुख्यमंत्री कॅ. सिंग यांचे मानसिक संतुलन हरवले आहे. आता ते मुख्यमंत्री होण्यासाठी फिट नाहीत, अशी जहरी टीका केल्यामुळे काँग्रेसमधील नेत्यांची मने किती दुभंगली गेली आहेत, हे लक्षात यायला हरकत नाही.

कॅ. सिंग यांना बाजवा यांनी काही पत्रे पाठविली. त्याचे उत्तर कॅ. सिंग यांनी दिले नाही. सरकार कसे चालवायचे, हे मला शिकवायचे नाही, अशी त्यांची भूमिका आहे, तर खासदार या नात्याने सरकारविषयी जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे, असे बाजवा यांचे म्हणणे आहे.

पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला प्रश्न विचारण्याचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. कॅ. सिंग स्वत: ला महाराजा मानतात आणि त्यांच्यासारखे वागतात, असा त्यांचा आरोप आहे. विषारी दारूच्या प्रकरणाची चौकशी सीबीआय किंवा ईडीकडे सोपविण्याचा आग्रह बाजवा यांनी धरला आहे, तर पंजाब पोलिस त्यासाठी सक्षम आहेत, अशी भूमिका कॅ. सिंग यांनी घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी अमृतसर येथे दस-याच्या दिवशी रेल्वे अपघात झाला होता. त्यात सुमारे 60 जण ठार झाले. याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले; परंतु त्याबद्दल पुढे काहीही झाले नाही, असा बाजवा यांचा आक्षेप आहे. बटाला येथेही फटाका कारखान्यात स्फोट झाला आणि त्यानंतर विशेष पोलिस पथक स्थापन करण्यात आले होते. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही आणि कोणतीही कारवाई झाली नाही. आताही विषारी दारूच्या बाबतीत विशेष पोलिस पथक स्थापन केले आहे.

कॅ. सिंग यांच्याकडे गृह विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग आहे. अशा परिस्थितीत जालंधरचे विभागीय आयुक्त या प्रकरणाची चौकशी कशी करतील, असा प्रश्न पडतो. ईडी किंवा सीबीआयमार्फत याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे, असे बाजवा यांचे म्हणणे आहे. कॅ. सिंग यांचा लोकशाहीवर विश्वास असेल, तर त्यांनी पटियालाचा महाराजा नव्हे, तर लोकशाही पद्धतीने निवडलेले मुख्यमंत्री म्हणून कारभार करावा, असा टोला लगावला आहे. माझे वडील 198 7 मध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले. 1990  मध्ये मला मोठ्या कारच्या स्फोटात लक्ष्य करण्यात आले. माझा मोठा भाऊ कारगिल युद्धाच्या नायकांपैकी एक आहे.  1980 पासून मला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे आणि हे राजकीय स्तरांमुळे नव्हे, तर सुरक्षेच्या कारणास्तव केले गेले आहे.

जेव्हा एखाद्या नागरिकाच्या सुरक्षेस धोका निर्माण होतो तेव्हा त्याच्या सुरक्षेसाठी सरकार आणि प्रशासन जबाबदार असतात, अशा शब्दांत त्यांनी कॅ.सिंग यांच्यावर हल्ला चढविला. गेला महिनाभर चाललेल्या आरोप प्रत्यारोपांनंतर राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या यशस्वी हस्तक्षेपानंतर नुकताच मिटला आहे. राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत, तोच  पंजाबमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता काँग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे. या वादातून पक्षश्रेष्ठी कसा मार्ग काढतात, हे आता पाहायचे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here