Rahuri : चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत तीन दुकानांसह घरफोडी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी शहरात अज्ञात चार ते पाच चोरट्यांच्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातला. एकाच रात्री शहरातील तीन किराणा दुकान तर एक बंद घर अशा चार ठिकाणी चो-या करून लाखों रूपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली, असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटिव्ही कॅमे-यांची तपासणी करून पाहणी करत माहिती घेतली.
राहुरी शहरातील मुलन माथा परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर संदीप देवराम नन्नवरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सामानाची उचकापाचक केली. बैठक खोलीत सोफ्यामध्ये ठेवलेले मोठे गंठण, नाकातील नथ, कानातील डूल असे सुमारे सव्वा सहा तोळे सोन्याचे दागिने व सुमारे ७८ हजार रूपये रोख, असा एकूण तीन ते चार लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोड परिसरात आपला मोर्चा वळविला.
स्टेशन रोड परिसरातील सचिन खांदे यांचे नमोह नारायण ट्रेडर्स नावाचे दुकानचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी दहा ते पंधरा हजार रूपयांचे ड्राय फ्रुट चोरट्यांनी पळवून नेले. त्यानंतर याच परिसरात असलेले कपील चोरडिया यांचे अरिहंत प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरडिया यांना जाग आल्यामुळे चोरट्यांना त्या ठिकाणाहून पळ काढावा लागला. त्यानंतर या चोरट्यांनी नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या राजेंद्र कांतीलाल मुथ्था यांचे भाग्यश्री सुपर मार्केट या दुकानाचे कुलूप पहाटे चार वाजे दरम्यान तोडून आत प्रवेश केला. यावेळी दुकानातील काजू, बदाम, गावरान तुप असा सुमारे वीस ते पंचवीस हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.

एकाच रात्री तीन किराणा दुकान व एका बंद घरात चोरी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा लाखो रूपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केलाय. यावेळी अहमदनगर येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. रक्षा नावाचे मादी श्वान संदीप नन्नवरे यांच्या घरातच घुटमळले. रात्रभर पाऊस सुरू असल्याने श्वान घरातच घुटमळले, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

यावेळी श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, राहुरी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल, पोलीस नाईक प्रविण खंडागळे, दिपक फुंदे, सुशांत दिवटे, योगेश वाघ आणि अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, मनोज गोसावी तसेच श्वान पथकातील पोलिस उप निरीक्षक संदीप बावळे, राजू वैराळ, निलकंठ गोरे, चालक गडदे आदिंनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मात्र, चोरट्यांचा कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नाही. या घटनेतून चोरांनी राहुरी पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे. या घटनेबाबत संदीप नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here