Ahmadnagar : हिवरे बाजार ग्रामविकासात देशाला प्रेरणा देणारे गाव – हसन मुश्रीफ 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगर – आदर्श गाव हिवरे बाजार देशाला ग्रामविकासाची दिशा देणारे गाव आहे, असे मत राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार उपस्थित होते. या दरम्यान त्यांनी गेल्या ३० वर्षात हिवरे बाजारमध्ये झालेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून पोपटराव पवार यांच्याशी विस्तीर्ण चर्चा केली.

मुश्रीफ यांच्या हस्ते कृषी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जलपूजनही करण्यात आले. सध्या हिवरे बाजारमध्ये भारतीय संविधानाचे पारायण (वाचन) चालू आहे. यावेळी मंत्री महोदयांनी संविधानाचे वाचन करून हिवरे बाजारच्या अभियानात सहभाग घेतला. संपूर्ण शिवार पाहणीनंतर हिवरे बाजार गावाचे ग्रामपंचायतच्या माध्यमातून व लोकसहभागातून शासनांच्या विविध योजनांचे प्रभावीपणे नियोजन पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले. म्हणूनच आज हे गाव सर्वार्थाने स्वयंपूर्ण आदर्श गाव आहे. या पद्धतीने प्रत्येक गावाने आपल्या गरजा ओळखून शासकीय योजनांचा व्यवस्थित उपयोग करून घेतल्यास प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या सुधारणेसाठी नवीन समिती करून ग्रामविकासाबाबत काही सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी काही धोरणे बदलावी लागली तरी चालेल.

यावेळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अहमदनगर जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण अजित पाटील, तहसीलदार नगर उमेश पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, पोलीस निरीक्षक शंकरसिंह रजपूत व इतर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here