!!भास्करायण !! स्वातंत्र्याची वाटचाल स्वैराचाराकडे

भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ ) 
+++++++++++++++

आज आपल्या देशाचा स्वातंञ्यदिन. देशाला स्वातंत्र्य मिळून आज ञ्याहत्त्तर वर्षे झालीत. स्वातंत्र्य प्राप्तीपासूनचा आजवरचा प्रवास हा, अत्यंत चढउताराचा आणि आव्हानांचा ठरला. आजवर कधी नव्हती अशी आव्हाने देशापुढे उभी ठाकली आहेत. शेजारी राष्ट्रांची घुसखोरी, दहशदवादाचा पोसलेला राक्षस, नक्षलवादाने देशभरात पसरविलेले हातपाय, धगधगता दहशतवाद आणि ज्वालामुखीच्या तोंडावर असलेले धृवीकरण. हिंसाचार, बलात्कार, गुन्हेगारीने मांडलेले थैमान आणि यात भरीस भर म्हणजे बेताल व बेपर्वा राजकारणी. राजकारण्यांचा आणि नोकरशाहीचा भ्रष्टाचार!

भारतभूमीला परकियांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतीविरांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. ज्ञात अज्ञातांनी हौतात्म्य पत्करले. बलिदानातून स्वातंत्र्याची ‘रम्य पहाट’ या देशाने पाहिली. स्वांतंत्र्य मिळालं तेव्हा अवघा देश भारुन गेला होता. पारतंत्र्य जाऊन स्वतःचे राज्य आले, आता आपला विकास आणि प्रगतीची पहाटही बघायला मिळेल, असा आशेचा किरण जनता बघू लागली.

आजची देशाची अवस्था बघता, जनतेच्या स्वप्नांचा व आशेचा चुराडा झालेला बघायला मिळतो. आज देशात जे चाललंय, त्याला स्वांतंत्र्य म्हणता येईल? ञ्याहत्तर वर्षानंतरही आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजू शकला नाही, ही देशाची शोकांतिका नाही तर काय? आपल्या बरोबरीने स्वतंत्र झालेली, दुसर्या महायुध्दात बेचिराख झालेले जपान, जर्मनी, फ्रान्स, इटली, कोरिया यासारख्या राष्ट्रांची प्रगती बघितली, तर आपण कुठे आहोत हे समजते. दुस-या महायुद्धात हिरोशिमा व नागासाकी येथे अमेरिकेने अणूबॉम्ब टाकले. अवघे जपान राष्ट्र नेस्तनाबूत झाले. पण तिथले राज्यकर्ते आणि युवक डगमगले नाहीत. राष्ट्रवादाने पेटून उठत फिनिक्स पक्षाने राखेतून झेप घ्यावी, तशी झेप घेतली! जपानच्या आजच्या प्रगतीने अवघ्या जगाला अचंबित करुन टाकले. हि किमया घडली कशामुळे? तर, प्रखर राष्ट्रप्रेम आणि आदर्शवत राज्यव्यवस्थेला जनतेने दिलेली साथ, याच्या जोरावर.

आपल्या देशाची चक्रे नेमकी उलट्या दिशेने फिरत आहेत. स्वांतंत्र्य म्हणजे स्वैराचार असा चुकीचा अर्थ आपण काढला. ञ्याहत्तर वर्षे होवूनही आपल्याला आपल्या देशाचे संविधान नीट समजलेले नाही, याला काय म्हणणार? स्वांतंत्र्य म्हणजे ज्याला त्याला आपल्या पध्तीने जगण्याचा मिळालेला परवाना, असा आपला समज आहे. या समजानेच देशाचा आत्मघात केलाय. ज्यांच्या हाती देशाचे प्रजासत्ताक आहे, ते राज्यकर्ते भ्रष्टाचाराचे स्वातंत्र्य उपभोगीत आहेत. संसद, विधानसभा ही लोकशाहिची मंदिरे न उरता, एकमेकाचे उणेदुणे, हाणामा-या, आरोप प्रत्यारोप इतकेच नव्हे, तर संसदिय परंपरेचे अवमुल्यन करणारी केंद्रे बनली आहेत.

गेल्या काही वर्षातील घटना बघितल्या, तर आपल्यापुढं काय वाढून ठेवलंय याची कल्पना येते. थोर महापुरुषांची विटंबना. संविधानातील तत्वांची पायमल्ली. नैतिक मुल्यांचा -हास, वाढता भ्रष्टाचार आणि चंगळवाद. दिवसागणिक राज्यकर्त्यांच्या नैतिकतेचा सत्यानाश होत असतांना, जनता मात्र संवेदना हरवून बसलीय. स्वातंत्र्याचा अर्थ गमावून बसलिय. स्वातंत्र्य कशासाठी मिळविले, हेच आपले राज्यकर्ते आणि आपण समजून घेवू शकलो नाही. आज अवघा देश व त्यातल्या त्यात ज्यांच्या हाती देशाचे भवितव्य आहे, ती युवा पिढी अस्वस्थ आहे. अंगी उर्मी आणि डोळ्यात स्वप्न असूनही, त्यांची स्वप्नपूर्ती होत नाही म्हणून या तरुणाईची घुसमट होत आहे. ही घुसमट आता असंतोषात रुपांतरीत झाल्याचे दिसतेय. अनेक दहशतवादी व नक्षलवादी घटनेच मोठ्या प्रमाणावर तरुणाई सापडते. ज्या हातात प्रगतीची मशाल हवी, त्या हातात शस्त्रे कां घेतली जात आहेत, याचा विचार आपले राज्यकर्ते कधी करणार? भगतसिंग, राजगुरु, सुखदेवांसारख्या देशासाठी बलिदान देणाऱ्या मातीतून देशावरच शस्त्र उगारणारे युवक निर्माण होणे, यापरते दूर्दैव कोणते?

गेल्या काही वर्षापासून धर्मवाद आणि जातीभेदाची दरी रुंदावत आहे. रोजीरोटी आणि उदनिर्वाहापेक्षा जातपात व धर्मवाद महत्वाचा ठरतोय. देशात जातीय आरक्षणाचे काहूर माजलेय. प्रत्येकजण राष्ट्रीय हितापेक्षा स्वजातहिताला महत्व देताना दिसत आहे. या प्रश्नाच्या मूळापर्यंत जाण्याऐवजी सामाजिक प्रश्नांचे राजकारण केले जात आहे. हा देशापुढचा सर्वात मोठा धोका आहे. सध्याच्या सामाजिक समस्यांचे मूळ विषमतेत दडलेय, हेच कोणाला कळेनासे झाले आहे. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्यवृक्षाला प्रगती, विकास व आत्मसन्मानाची फळे लागलीत कां, हा प्रश्न लाख मोलाचा ठरतो. आजची सामाजिक अवस्था बघता आपल्या स्वातंत्र्याची वाटचाल झुंडशाही, अराजकता आणि स्वैराचाराकडे होत असल्याचेच दिसते.

2 COMMENTS

  1. Excellent post. I used to be checking continuously this weblog and I am inspired! Very useful info specifically the closing part 🙂 I care for such info a lot. I used to be seeking this certain information for a long time. Thanks and best of luck.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here