लहानपण पण देगा देवा…

शितल चित्ते मलठणकर पुणे (९८५०८८८४०४ )
+++++++++++++++

लहानपण देगा देवा l
मुंगी साखरेचा रवा ll
ऐरावत रत्न थोरl
त्यासी अंकुशाचा मार ll
जया अंगी मोठेपण l
तया यातना कठीण ll
तुका म्हणे बरवे जाण l
व्हावे लहानाहून लहान ll

या ओळी आठवल्या की मन बालपणात हरवून जाते. प्रत्येक मोठ्या व्यक्तीस लहानपणाची भूरळ पडते.”लहानपण” हा शब्द उच्चारला तरी मन पाखरू होऊन, हवेत हलकेच हिंदोळे घ्यायला लागते. श्रावणाच्या सरीत पडणार्‍या इंद्रधनूप्रमाणे मन फुललेल्या मोरपिसा-या सारखे थुई थुई नाचत खुलू लागते.

पण, हे काही क्षणाच्या स्वप्नासारखं असतं. कारण, वास्तवाचे भान होताच आता आपण लहान राहिलेलो नाही याची जाणीव होते.बालपणासारखे वागायचे जरी ठरवले, तरी ‘लोक काय म्हणतील’ ही सामाजिक खंत उराशी बाळगून बालपणाच्या आठवणीत रममाण होणे आपल्या हाती उरते.

बालपणातील केलेल्या गमतीशीर खोड्या, सुट्टीतल्या धमाली, हेरुन चोरलेल्या कैऱ्या-चिंचा, शाळेत केलेल्या गंमतीजमती, विटी- दांडू, गोट्या खेळताना, पतंग उडवताना कधीही वेळेचे,तहानभूकेचे न राहिलेले भान. कसेही वागा, कुठेही भटका. पण, हया सर्वांमुळे घरच्यांचा किंवा शाळेतील गुरुजींचा खाल्लेला मार! मार खाताना नेहमी वाटायचे की मी मोठा कधी होणार……

जेव्हा बालपणीचे मित्र-मैत्रिणी भेटतात, त्यावेळी जुने दिवस, लहानपणच्या आठवणी जागवल्या जातात. मन हमखास परत एकदा लहान व्हावं असं सांगत राहातं. जेव्हा कामांचा, जबाबदाऱ्यांचा भार असह्य होतो, तेव्हा निरागस जबाबदारीमुक्त बालपण आठवते. तसे मुक्त जगावेसे वाटते. दुःख झाले तर ओक्साबोक्सी रडावे आणि आनंद झाला तर बेभानपणे उड्या मारत मोठ्याने ओरडावे असे वाटते.

पण ,नाण्याची दुसरी बाजू बघितली तर खरंच ,आपल्याला लहानपण हवं असतं का? की बालपणीचा निरागसपणा आणि जबाबदारी नसणं हे जास्त भावत असतं? आज आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या निर्णयासाठी कोणावरही अवलंबून नाही आहोत. नकळत आपल्याला या स्वातंत्र्याची सवय झालेली असते.

लहानपण म्हटले की, प्रत्येक निर्णयासाठी मोठ्यांवर अवलंबून राहवं लागतं. शाळा, अभ्यास, नावडती परीक्षा ,आईने हाक मारल्यामुळे अर्धवट राहिलेला खेळाचा डाव, लहान असल्यामुळे बऱ्याचशा न करता आलेल्या गोष्टी, हे बालपणीचे दुःख असते. तेच दुःख मोठे झाल्यावर वाढलेल्या जबाबदाऱ्यांचे असते. त्यामुळे लहानपण मागतांना आपण हा विचार नक्की करायला हवा की, आपल्याला जबाबदारीमुक्त लहानपण हवे आहे की, मोठ्या वयात अंगावर पडणारी जबाबदारी नकोय.
तसेही वरील अभंगात तुकाराम महाराजांनी कोठेही म्हटले नाही की, आपण परत लहान व्हावं. तर या अभंगातून त्यांनी लहान मुलांचा लवचिकपणा, निरागसपणा,आवखळपणा आपण कायम अंगी बाळगावा, असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जसजसे मोठे होता, तसतशा जबाबदाऱ्या वाढणारचं आहेत . तुमच्याकडून जे निर्णय घेतले जाणार आहेत त्यांच्या चांगल्या वाईट परिणामांची जबाबदारी देखील तुमचीच असणार आहे .त्यापेक्षा आपण लहान होऊन जगलो तर खूप काही शिकू शकतो.

नुकतंच नेटवर्किंग साइटवर एक सुंदर वाक्य वाचायला मिळालं “हरवलेलं काही नाही, फक्त आपलं बालपण! तुम्ही आपल्या मुलांमध्ये पहा. सर्व तुम्हाला जवळच सापडेल. फरक आहे तो फक्त काळाचा!”

तरीही असे वाटते की, काळाचा हा फरक आयुष्यातून पुन्हा वजा करता आला तर ?
कारण, कितीही मोठे झालो तरी आजही आईचा लहानपणी डोक्यावरून फिरलेला मायेचा उबदार हात, परत फिरून घ्यावासा वाटतो. परत एकदा आईच्या कुशीत हळूच शिरून विसावंसं वाटतं. त्यासाठी लहान व्हावेसे वाटते. लहानपण परतून येणार नसले तरी, आहे त्या वयात वागण्यात बालपण जपणे शक्य आहे.थोडक्यात “प्रौढत्वे नीज शैशवास जपणे बाणा कवीचा असे”हा मंञ मनी बिंबवून जगणं शिकायला हवं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here