पवार कुटुंबातील वादावर भाष्य करण्यास रोहित यांचा नकार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ यांच्याबाबत काढलेल्या कडवट वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास आमदार रोहित पवार यांनी नकार दिला. या वेळी कुटुंबात सुरू असलेल्या वादावर पवार साहेब बोलतील आणि निर्णय घेतील, असे म्हणत अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले.

पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ यांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले. साहजिकच याचा परिणाम पक्षासोबतच पवार कुटुंबावरही झाल्याचे बोलले जाते. गेली दोन दिवस अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ यांच्यात बैठका झाल्या. हाच वाद आता सोडवण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांचे कुटुंबीय शनिवार आणि रविवारी बारामतीत एकत्र भेटणार असल्याची माहिती आहे. अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या बारामतीच्या घरी पार्थसंबंधी पवार कुटुंबीयांची एकञित बैठक होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार आणि या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खरेतर, विधानसभेच्या वेळीही श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीनेच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये समेट घडला होता. त्यामुळे या वेळीही पवार कुटुंबात पार्थवरून निर्माण झालेला तिढा श्रीनिवास पवारच सोडवण्याची शक्यता आहे. दरम्यान, पवार कुटुंबाच्या या एकूण वादात संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here