भास्करायण : सावधानऽऽऽपोळा फुटला आहे!

भास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१)

कालच पिठोरी अमावस्या अर्थात ‘बैलपोळा.’ गावागावातील पाटील, राजकीय प्रतिष्ठीत, गाव कारभारी यांचे सजलेले बैल गावाच्या वेशीत जमा झाले. सोबतीला गावातल्या हवश्या-नवश्याचे बैल, गोर्‍हे हे देखील गावकारभार्‍यांच्या ‘प्रतिष्ठीत’ बैलांच्या साथीला उभे राहिले! ज्या-त्या गावाच्या रितीनुसार पोळा फुटला. कोणत्या पाटलाच्या, गाव कारभार्‍यांच्या किंवा राजकीय प्रतिष्ठीताच्या बैलाने पोळा फोडला याची चर्चा गावभर चालेल. नाव बैलाचं पण त्या बैला आडून ‘नेम’ साधला जातो तो मात्र वेगळाच!

खरं बोला; पोळ्याचं निमित्त साधून गावागावात काय चालतंय हो? ज्या बैलांसाठी हा सण ‘राखीव’ असतो, त्या बिचार्‍यांची आठवण तरी निघते? खरं तर पोळा हा शेतीसाठी राबणार्‍या बैलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा, आपल्या उदात्त कृषि संस्कृतीतला सण. या सणाचा गावकारभार्‍यांनी आणि त्यांची चमचेगिरी करणार्‍या टग्यांनी पार नासाडा करुन टाकलाय. त्यामुळं हा सण बैलांचा न राहाता गावातल्या ‘राजकीय शिंगरांचा’ उत्सव झालाय.

पोळ्याच्या दिवशी वास्तविक बैलाकडून काम करुन घ्यायचं नाही, त्याला पूर्ण आराम द्यायचा. शेतकरी धर्मानुसार मानपान द्यायचा. हे राहतं बाजूला अन् भलताच ‘धर्म’ पाळला जातो अन् उलटाच पोळा साजरा होतो! बैलाला विश्रांती देण्याऐवजी गावकारभार्‍यांच्या प्रतिष्ठेसाठी आर्‍या टोचीत वेशीवर नेलं जातं. काही बहाद्दर स्वत: ‘टाईट’ तर होतातच, पण बैलालाही पाजून ‘उपकार’ फेडतात! शाब्बास राजकीय गोर्‍ह्यांनो! जगाच्या पाठीवर मुक्या प्राण्यांवर अशा तर्‍हेने ‘ओतपोत’ प्रेम क्वचितच कोणी दाखवीत असेल!

एकीकडे स्वत: ढोसता, ढोसता मुक्या प्राण्याच्या नरड्यात बळेच बाटली रिचवायची. एवढा उपद्व्याप कशासाठी? पोळा सणाच्या ‘सेलिब्रेशन’ चा आनंद बैलांना मिळावा यासाठी? यातलं काही नाही खरं तर बैलांना पाजणारे स्वत: पिवून ‘बैल’ झालेले असतात. हे ‘बैलपण’ जागं झालं की, मग माणूस जनावरागत वागायला लागतो. सणसूद विसरुन आर्‍या टोचायला लागतो. एकीकडे प्रेम दाखवायचं अन् त्याचवेळी आर्‍याही टोचायच्या! भले रे भले! याला म्हणतात उपकाराची फेड!
तर काय म्हणत होतो आम्ही? आम्ही सांगत होतो ते असं की, पोळा हा गावकारभारी आणि गावटग्यांना एकमेकाची जिरवाजीरवी करण्याची संधी देणारा सण बनवला गेला.

बैलांबरोबरच पोळा हा ‘राजकीय पोळ’ आणि ‘गोर्‍ह्यांचा’ ही उत्सव झालाय. राजकारणातले हेवे दावे, निवडणूकीतील जय-पराजय, पारंपारिक प्रतिष्ठेची चढाओढ अशा निमित्ताने उफाळून येते. पोळ्याच्या दिवशी गावाची वेस ही ‘प्रतिष्ठेची’ सिमारेषा ठरते, तर ‘बैल’ हे जिरवाजीरवीचं साधन बनतं! काय खरंय ना?

तर हे असं आहे. पोळा हे फक्त निमित्त आहे. खोलात गेलं तर हा सण चार पायांच्या बैलांचा नसून राजकीय आणि प्रतिष्ठेच्या लढाईत धन्यता मानणार्‍या पोळांचा ‘पोळा’ आहे. या पोळांच्या जोडीला ‘हवशे-नवशे’ गोर्‍हे, शिंगर असतात. कोणत्याही पक्षाचं बाशिंग, गटाचं-तटाची बेगडं, द्वेष आणि मत्सराचा पारंपारिक हिंगूळ आणि घराण्याच्या अस्मितेचा ‘शेंबी-गोंडा’ असा साज-शृंगार हे या राजकीय पोळ्याचं खास आकर्षण!

असा साजशृंगार करुन, नटून-थटून गावातले ‘राजकीय पोळ’ वेशीकडे निघतात. गावातले ‘गावटगे’ आणि ‘शिंगरं’ स्वत: पिता-पिता चार-दोन घोट या पोळाच्या नरडीतही ओततात. एकदा हे घोट नरडीखाली गेले की, पोळ ‘मस्तवाल’ होतो. मस्तवाल पोळाला मग गावटगे अन् शिंगरं प्रतिष्ठेच्या, राजकीय हमरी-तुमरीच्या, घराण्याच्या अस्मितेच्या ‘आर्‍या’ टोचतात. त्याच्या घराण्याची ‘शेप’ पिरगळतात. घराण्याची शेप पिरगळली अन् प्रतिष्ठेची आरी टोचली रे टोचली की हा पोळ उधळलाच समजा! पोळ उधळला की टग्यांची अन् शिंगरांची मज्जाच मजा!

पोळ उघळला की, वेस राहते बाजूला अन् हा भलतीकडच खुरांनी माती उकरु लागतो अन् शिंगं खूपसू लागतो! थोडक्यात ‘है क्या कोई माई का लाल?’ असं! प्रतिष्ठेच्या खुरांनी अन् राजकीय शिंग खुपसल्यानं द्वेष-मत्सराचा धुराडा उडतो. या धुराड्यात कोण कुठं पळतो अन् काय करतो, हेच गावाला समजत नाही. गावटगे, पोळांचे चमचे अन् शिंगरं मात्र त्यांचा पोळ वेशीवर गेलेला नसताना सुद्धा आपल्याच पोळानं पोळा फोडला असे ‘डिक्लेर’ करुन मोकळे होतात. अनेकांनी पोळा प्रत्यक्ष पाहिलेला असतो. तो खरा कोणी फोडला हेही ठाऊक असतं. पण खरं बोलावं तर हा ‘पोळ’ घेवू का शिंगावर म्हणून उगरायचा! यामुळं गावातल्या बुद्धीजीवी ‘थर्ड हंम्पायर’ चा करंट असताना फ्यूज उडतो! अशा मोक्याच्या वेळी शहाण्यासुरत्यांचा फ्यूज उडतो अन् पोळाचं फावतं.

गावा-गावांची स्थिती ही अशी आहे. प्रतिष्ठेचा, घराण्यांच्या हेव्यादाव्यांचा, राजकारणाचा ‘पोळा’ फुटतो… गावातले थर्ड हंम्पायर म्हणजे शहाणी-सुरती माणसं मात्र पोळांच्या धाकाभ्यानं गप्प! शेकडो वर्षापासून हे चालत आलंय. पुढंही चालत राहील यात शंका नाही. कारण ‘पोळा’ हे फक्त निमित्त आहे. या सणाआड गावकारभारांचा ‘राजकीय उत्सव’ अन् टग्या-शिंगरांचा ‘उरुस’ दडलेला आहे. या सगळ्यात गावाचं काय? त्याच्या नशिबी शेकडो वर्षे राजकीय पोळांचा पोळा फुटतो आहे. सज्ज रहा. सावधान रहा… या पलिकडं आम्ही तरी काय बोंब मारणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here