नितीशकुमारांवर बोलण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही

पोलीस महासंचालक पांडेंची आगपाखड
पाटणा : ‘बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बोलण्याची अभिनेत्री रिया चक्रवर्तीची लायकी नाही’, असं बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे म्हणाले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतल्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी रिया चक्रवर्तीने बिहारच्या मुख्यमंत्र्यांसंबधित केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता गुप्तेश्वर पांडेंनी टीका केली
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पाठिंब्यामुळेच सुशांत प्रकरणात न्याय मिळण्याची आशा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी करण्याइतपत रिया चक्रवर्तीची लायकी नाही, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याने मी खूप खूश आहे. हा अन्यायाविरोधात न्यायाचा विजय आहे. हा देशाच्या 130 कोटी जनतेच्या भावनांचा विजय आहे. सुशांत प्रकरणाशीसंबंधीत खर्‍या गोष्टी उघड व्हाव्यात, अशी लोकांची इच्छा आहे. लोकांची ही इच्छा आता पूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया गुप्तेश्वर पांडे यांनी दिली.
आमच्यावर आरोप केले जात होते, आम्ही एफआरआय का दाखल केला? असा सवाल विचारला जात होता. आम्हाला तपास करु देत नव्हते. आमच्या तपासात अडथळा आणला जात होता. आम्ही तपासासाठी आयपीएस अधिकार्‍याला पाठवले तर त्याला रातोरात क्वारंटाईन केलं गेलं. यातूनच काहीतरी गडबड आहे, हे जाणवत होतं, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here