Special Story : अर्थाच्या शोधातील निरलस भारतसेवक 

भागा वरखडे
रंगाने गुलाबी- गोरा, विलक्षण नम्र, नर्म विनोद स्वतःवर करणारा आणि हसतमुख असा हा युरोपियन माणूस कुठेही गेला की कुतूहलाचा विषय बनतोच. त्याच्याशी लोक इंग्रजीत बोलू लागले की, तो मात्र अस्खलित मराठीत प्रतिसाद देतो. 
“नमस्कार दादा (किंवा ताई), माझे नाव निक स्टावरसन आहे. मी अहमदनगरमध्ये मागील 6 वर्षांपासून राहतो. स्नेहालय, या संस्थेसोबत सेवेचे काम करतो. तुम्हाला भेटून मला फार आनंद झाला. तुम्ही काय काम करता ? मी तुम्हाला काही मदत करू शकतो का ?….”
निककडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नसणाऱ्यांना हे अस्सल मराठी ऐकूण एकदम सुखद धक्काच बसतो. त्याला पाहिल्यावर आणि थोडासा संवाद केल्यानंतर प्रत्येकजण लगेच ज्याच्या प्रेमात पडतो, असा हा मुळखावेगळा माणूस.
12 ऑगस्ट रोजी वयाची साठी निक याने ओलांडली. सध्याच्या कोविड  संसर्गाच्या वातावरणामुळे मागील 150 दिवसांपासून निक, त्याची स्कॉटिश सहकारी श्रीमती जोयस कॉनोली, स्नेहालयमधील निवासी कार्यकर्ते 350 विशेष गरजयुक्त बालकांच्या रक्षण आणि व्यक्तिमत्व विकासात मग्न आहेत. यातील कोणालाही बाहेरच्या व्यक्तीला समक्ष भेटणे शक्य  नाही. त्यामुळे स्नेहालय संस्थेतील मुले, सेवक, कार्यकर्ते यांच्यासोबत अगदी साधेपणाने निक याची साठी साजरी करण्यात आली. केक कापण्याऐवजी त्याच्यावर दिलखुलास प्रेम करणाऱ्या स्नेहालयातील मुला-मुलींनी निकला खास मराठी पुरणपोळी आणि शेपी आमटी बनवून खिलवली.
गेली 6 वर्ष कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता, अहोरात्र वंचित बालकांची सेवा निक करीत आहे. साठीनिमित्त एक कृतज्ञता सोहळा आयोजित करण्याचा आमचा प्रस्ताव त्याने नम्रपणे नाकारला.
निक आम्हाला म्हणाला की, “मी कोणते महान काम, सेवा किंवा सत्कृत्य केले, असे मलाच वाटत नाही. मृत्यूपूर्वी जीवनाला अर्थपूर्णता देण्याची मला आस लागली होती आणि आहे. ही शोध यात्रा मला भारतात आणि नंतर स्नेहालयात घेऊन आली. माझे जीवन समृद्ध करणारा,अनेक असामान्य अनुभवांनी भरलेला असा हा प्रवास होता. माझ्या जीवनाला एका सुखांकिकेत परिवर्तित केल्याबद्दल सर्व भारतीय आणि स्नेहालय परीवाराचाच मी कृतज्ञ आहे. माझा सत्कार नकोच…….”.
निक याच्या ईच्छेनुसार त्याला दुरूनच अर्थपूर्ण जीवनाच्या शुभेच्छा मी दिल्या. परंतु या भारतसेवकाची प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचावी  म्हणून निक याची साठी एक निमित्त. अहमदनगर जिल्ह्यात गेली 31 वर्ष स्नेहालय संस्था कार्यरत आहे. प्रामुख्याने महिला-बालके-एचआयव्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्ती, वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिला आणि त्यांची मुले, झोपडपट्टी तील आणि विशेष गरजयुक्त मुले, यांच्या शिक्षण- रोजगार प्रशिक्षण-आरोग्य-पुनर्वसन या सेवा निःशुल्क स्नेहालय संस्था पुरविते.
स्नेहालय संस्थेच्या कार्याचा पाया म्हणजे निस्पृह भावनेने कार्यरत सेवाभावी कार्यकर्ते केवळ देशातूनच नव्हे, तर इंग्लंड-अमेरिका-जर्मनी-द नेदरलँड्स, आदी देशातून सामाजिक कार्यकर्ते स्नेहालयात येऊन सेवाकार्य करतात. मानवतेला जाती- धर्म – भाषा – वंश – लिंग इत्यादी कुठल्याही सीमा नसतात. हे या प्रयोगातून नेहमीच सिद्ध होत आले.
2013 साली लंडनमध्ये आयुष्य गेलेला निक अल्बर्ट कॉक्स (स्टावरसन) प्रथम  स्नेहालयात आले. निक फक्त स्नेहालय नव्हे तर अहमदनगरमधील लहान-थोरांचा प्रचंड लाडका आहे. त्याला सर्व एकेरीमध्ये *निक*, असेच म्हणतात. आपण आपल्या आईला अग आई किंवा ए आई…. म्हणतो ना अगदी तसेच.
भारताच्या प्रेमात पडलेली आणि योगशिक्षिका म्हणून गोव्यात काम करणारी नीकची आवडती भाची कर्करोगाने देवाघरी गेली. तिच्या इच्छेनुसार तिचे अस्थिविसर्जन करण्यासाठी आणि तिच्या स्मरणार्थ काही सेवा-मदत कार्य करण्यासाठी नीक भारतात आला. ब्रिटिश रंगभूमीवर एकेकाळी लौकीक मिळवलेला  निक ब्रह्मचारी राहिला. परंतु मित्र मंडळाचा मोठा गोतावळा त्याने जोडला. महिनाभरात लंडनला परतण्याचा मनोदय त्यावेळी त्याने मित्रांना सांगितला. आपल्या आप्त-नातेवाईक-मित्र यांच्याकडून काही देणगी त्यांनी स्नेहालयसाठी गोळा केली होती. ती योग्य संस्थेला पोहोचती करण्यासाठी तो शोध घेत होता. त्याला स्नेहालय सापडले. एकेकाळी ब्रिटिश रंगभूमीवर निक हा एक  परिचित आणि प्रसिद्ध अभिनेता होता. त्याचा लंडनमधील दिनक्रम व्यस्त होता. वलयांकित आणि उत्तम मानधन देणारी कामे तो करीत होता.

लीड्स-बेकेट विद्यापीठातून स्नेहालयात स्वयंसेवक म्हणून आलेली एक मुलगी राज्य परिवहनच्या लाल परीतून (जनता बस)  उभ्याने प्रवास करत असताना निक याला भेटली. भारतात येण्याचे प्रयोजन निकने तिला सांगितले. तेव्हा तिने उत्साहाने  आपल्या लॅपटॉपवरील स्नेहालयचे फोटो निकला दाखविले. तिची आई स्वर्गीय प्राध्यापक कॅथरीन पियरसन हिने 1991 साली अहमदनगर येथे जाऊन डॉ. एस्.के. हळबे यांच्यासोबत स्नेहालय पाहिले होते. तिने आपल्या मुलीस ही माहिती दिली होती. तिने ती निक याला दिली.
या संस्थेसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, हा विचार निकने केला. त्यामधूनच निधी संकलनाची कल्पना त्यांना सुचली.  हाच निधी पोहोच करण्यासाठी निक स्नेहालयात दाखल झाला.
स्नेहालयाच्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांना सर्व प्रकल्पांचे कार्य दाखवण्यात आले. महिलांवरील अत्याचार, एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठीचे कार्य, लालबत्ती आणि झोपडपट्टी यातील दुःख बघून निक अस्वस्थ झाला.
९० च्या दशकात त्यांनी घरगुती हिंसाचार आणि एचआयव्हीचे बळी ठरलेले काही परिचित बघितले होते आणि त्यावेळेस त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकलो नाही. याची खंत त्यांच्या मनात घर करून होती. एक संस्था आपल्याला अपेक्षित असलेले कार्य करते आहे, हे बघून त्याचा उत्साह वाढला.
निक यांची पार्श्वभूमी रंगभूमी आणि दूरचित्रवाणीची होती. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी स्नेहालयाच्या कार्यावर आधारित एक उत्कृष्ट व्हिडियो बनवाला. तो युट्यूबच्या माध्यमातून देशा-विदेशात पोहिचाविला. स्नेहालयमधील ३ आठवड्याचे तेव्हाचे वास्तव्य त्याला क्षणिक वाटले.
नीकचे बालपण खडतर गेले. त्याचे वडील लंडनमधील नामचीन गुन्हेगार होते. 3 मुलांचे शिक्षण- संगोपन एकट्याने करताना त्याची आई जेरीला आली होती. त्यामुळे निक याला लहानपणापासून चरितार्थ उचलावा लागला. रोजंदारीची कामे करावी लागली. रंगभूमी ही त्याची पॅशन होती. परंतु मुलांचे आणि महिलांचे दैन्य- दुःख आणि अत्याचार यांनी तो आजही  जास्त हळवा होतो. स्नेहालयचे काम त्याला जगण्याला अर्थपूर्णता देणारे वाटले, ते यामुळेच.
२०१५ मध्ये निक ६ महिन्यासाठी स्वयंसेवक म्हणून स्नेहालयात आला. ६ महिन्यासाठी आलेले निक ५ वर्ष उलटूनही  स्नेहालयात मुलांसोबत रमला आहे.
स्नेहालयच्या विविध प्रकल्पांचे कार्य, येथील लाभार्थी, होणारे शिबिर-कार्यक्रम अशा सर्वांचे व्हिडियो बनवून स्नेहालयाच्या युट्यूब चॅनेलवरून तो नियमितपणे प्रसारित करत असतो.
इथे येणाऱ्या देशी आणि विदेशी स्वयंसेवकांचे नियोजन तो तत्परतेने करतो. विविध सेमिनार-कार्यशाळांमध्ये स्नेहालयाचे प्रतिनिधित्व निक सहज शैलीतील संभाषणाने करतो. त्याचा सगळ्यात आवडता विरंगुळा म्हणजे स्नेहालयातील बालगृहातील बालकांबरोबर संवाद. त्यांच्यासोबत सतत संभाषण करताना स्नेहालयातील मुले आता अतिशय सहज इंग्रजीमध्ये संवाद साधू शकतात.
अनाथ मुलांच्या भुकेच्या आणि ज्ञानाच्या गरजा संस्थांमध्ये भागविल्या जातात. परंतु त्यांच्या भावनिक-मानसिक आणि प्रेरणेच्या गरजा कशा ओळखायच्या आणि भागवायाच्या, हे निक याने सर्वांना शिकवले.
येथील अनेक मुले मोबाईलवर छोटे माहितीपर व्हिडियो बनविण्यास निक याने मुलांना शिकवले. इतर संस्थांच्या कार्यकर्त्यांना देखील निक याचे सोशल मीडिया हाताळण्याबाबत मार्गदर्शन मिळते. ज्ञान आणि अनुभव वाटताना स्नेहालय परिवाराच्या भावधारेला अनुसरून संस्थांचे आणि विचारांचे भेदाभेद निक कटाक्षाने पाळत नाही. संस्था असो की संघटना. भारतात जेथे माणसे जमतात, तेथे धर्म, राजकारण, माणसांचे आपसातील गॉसिपिंग, सत्तेची स्पर्धा , लहान स्तरावरील गटबाजी हे सर्व आपल्याकडे येतेच. निक मात्र स्वतःला निर्लेप ठेवतो. त्यामुळे तो प्रत्येकाचा आणि प्रत्येकजण त्याचा, अशी निक याची अवस्था असते.

स्नेहालयातील मुले, कार्यकर्ते सगळेच त्याला  ‘निक’अशी एकेरी हाक मारतात. निकला तेच आवडते. कोणी *सर* वगैरे म्हणू लागले की तो प्रेमळपणे ” मला फक्त नीक  म्हणा ,” असे सुचवतो. निकच्या ओळखी आता  स्नेहालय, लालबत्ती, झोपडपट्ट्या, यांच्या पुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत.

नगरमधील रिक्षावाले, फळवाले, छोटे दुकानदार, बिग-बाजार आणि इतर मॉल मधील कर्मचारी, अनेक शाळांमधील मुले, निक यांच्या परिचयाची झाली आहेत. त्यांना ओळखू लागली आहेत. अतिशय साधी राहणी, संपूर्ण शाकाहार, योग आणि भारतीय अध्यात्माची आवड, वाचन आणि प्रवासाची आवड, हे निक याचे मोठे आनंद आहेत. स्नेहालयातील खाणावळीत  रोजचे जेवण घेताना निक आता पक्के भारतीय झाले. पोळीचा व्यवस्थित, एकाच हाताने घास घेण्याचे कौशल्य त्यांना जमते. स्वयंपाकाचे पोहे, उपमा सारखे भारतीय फास्ट फुड ते बनवितात. सर्व भारतीय पक्वान्न त्यांना आवडतात. वडा-पाव, हा त्यांचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे!
आपल्या 6 वर्षाच्या भारतातील वास्तव्यात त्यांनी अनेक वेळा ट्रक, टेम्पो, रेल्वेच्या फुटबोर्डवर बसून देखील त्याने प्रवास केला आहे. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त 1 हजार किलोमीटरची सायकल रॅली स्नेहालयने आयोजिली होती. त्यातही निक सहभागी झाला. कमोडचा संडास, बिसलेरी पाणी, झोपायला गादी निक याला कधीच नको असते.
कार्यकर्ता दुसरा काय असतो ?
भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यांनी भटकंती केली. सर्व ठिकाणी कायमचे आप्त-मित्र जमविले. त्यांच्या ते कायम संपर्कात असतात. कर्नाटक येथील हंपी येथे चक्क एका गरीब कुटुंबातील मुलाने निक याला वडील मानले. निक याने स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास त्याला सर्वस्वी मदत केली. फक्त पैसेच दिले असे नाही तर व्यवसाय उत्तम कसा करावा आणि वाढवावा याचेही प्रशिक्षण दिले. आज तो मुलगा अनेकांचा पोशिंदा झाला आहे. त्याच्या घरातील देवघरात निक याचाही एक फोटो आहे. आपल्या बहिणीच्या विवाह सोहळ्यासाठी त्याने निक याला विशेष आमंत्रण दिले. निक तयारीसाठी 2 आठवडे तेथे राबला.
स्नेहालयात कर्करोग, एडस्  झालेल्या बालकांना त्यांच्या शेवटच्या क्षणी नीक सोबत हवा असतो. वंचित मुलांशी त्याच्या  असलेल्या भावबंधाबद्दल वेगळे काय सांगावे? निक जातो तिथे आनंद आणि चैतन्य निर्माण होते. निक यांच्या रूपाने स्नेहालयात एक अजातशत्रू गुणीजन राहतो.
जोपर्यंत सेवेच्या कामाने जीवनाची आशयसंपन्नता वाढत राहील, तोपर्यंत भारतात राहण्याचा निक याचा इरादा पक्का आहे.
“अकस्मिक दगावलो, तर स्नेहालय कुठेही दफन करा. पण त्यावर थडगे मात्र बांधू नका. येथील मुलांचे पाय मला नेहमी जाणवायला-लागायला हवेत. हा स्पर्श आणि संवेदना हीच माझ्या जगण्याची प्रेरणा आहे”,असे निक याने नमूद केले.
निक यांचा email nick@snehalaya.org असा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here