Kada : आष्टीच्या चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात चोरी

0
भगवान महावीरांसह सहा पितळी मुर्त्या चोरांनी लांबविल्या

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री आष्टी येथील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंदिरामधील भगवान महावीरांसह सहा पितळी मुर्त्यांची चोरी केल्याची घटना बुधावारी सकाळी निदर्शनास आल्यामुळे खळबळ उडाली. घटनास्थळी तहसीलदारांसह उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरिक्षकांनी भेट देऊन पुढील तपासाला गती दिली आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी शहरातील पेठगल्ली भागात सकल जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेले चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर आहे. या मंदिरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी जैन मंदिराचे मुख्य प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून मंदिरातील शेकडो वर्षापूर्वीच्या चोवीस तिर्थंकर भगवंतांच्या मुर्त्यांसह मानस्तंभ व इतर सहा पितळी मुर्ती लांबविल्याची घटना घडली. मंदिराचे पुजारी पंडीत धर्मेंद्र उपाध्ये हे दुस-या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिराची साफसफाई करण्यासाठी गेले असता चोरांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दाराचे कुलुप तोडून भगवंतांच्या मुर्त्यांची चोरी केल्याचे निदर्शनास आले.
मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच, आष्टीचे तहसीलदार वैभव महिंद्रकर यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, पोलिस निरिक्षक बाळासाहेब बडे, पीएसआय भारत मोरे आदींनी तातडीने जैन मंदिराला भेट देऊन  पाहणी केली. तसेच चोरीच्या पुढील तपासाला गती देण्यात आली. जैन बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित असलेल्या मंदिरातील मुर्त्यांची चोरी झाल्यामुळे समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी चोरीचा त्वरित तपास करण्याची मागणी सकल जैन समाजाकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here