Crime : …आपसी भांडणात नव्हे तर स्वस्तातील सोन्याच्या आमिषाने घेतला चौघांचा बळी

विसापूर फाटा येथील हत्याकांडाला वेगळे वळण, नवीन माहिती उघडकीस
वाचा नेमके काय घडले

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पूर्व वैमनस्यातून आपसी भांडणात चार तरुणांचा मृत्यू झाला होता. विसापूर फाटा येथील या हत्याकांडाला आता वेगळे वळण मिळाले आहे. आपसी भांडणात नव्हे तर स्वस्तातील सोन्याच्या आमिषाने चौघांचा बळी गेल्याची माहिती पोलीस तपासात उघड होत आहे. जळगाव येथून स्वस्तात सोने घेण्यासाठी आलेल्या लोकांनी आपला विश्वासघात झाल्याचे समजताच या चौघांवर चाकूने सपासप वार करून जळगावच्या दिशेने पळ काढला, असे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्या नजीक जळगाव जिल्ह्यातील काही व्यक्ती दोन महिलांसह एका वाहनातून सुरेगाव विसापूर फाटा या ठिकाणी स्वस्तात सोने घेण्यासाठी आले होते. मात्र, आपली फसवणूक होऊ शकते. या कारणामुळे बाहेरून आलेले लोक तयारीत आले होते.आपली फसवणूक होत आहे हे लक्षात येताच त्यांनी चाकूने सपासप वार करून चौघांना जागीच ठार केले आहे. त्यामुळे स्वस्तात सोने महागात नव्हे तर जीवावर बेतले, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून अनेकांना लुटल्याच्या अनेक घटना ताज्या असताना जळगाव जिल्ह्यातील काही लोक स्वस्तात सोने घेण्याच्या आमिषाने सुरेगाव विसापूर फाटा या ठिकाणी आले. मात्र, आपली फसवणूक होऊ शकते याची शक्यता त्यांना सुरुवातीपासून असल्याने जळगाव जिल्ह्याच्या परिसरातील लोक तयारीनिशी आले होते. त्यातील एक उंच असणाऱ्या व्यक्तीने हातात एक धारदार चाकू लपला होता. तिकडेही प्लॅनिंग चालले होते. ठरल्याप्रमाणे पैशाची बॅग मिळाली की ती हिसकावली गेली. मात्र, त्याच वेळी समोरच्या व्यक्तीने सपासप वार करीत त्यांचा खात्मा केला व तेथून पसार झाल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग रात्रीपासून बेलवडी पोलीस ठाण्यात तळ ठोकून असून तपासाची सूत्रे त्यांनी स्वतःकडे घेतली असल्याची माहिती आहे. मात्र काल दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या या हत्याकांडाचे वास्तव्य वेगळेच निघत आहे. असे मयताच्या आईने तिच्या सख्या भावाविरुद्ध बेलवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात अक्षय उंबऱ्या काळे, मिथुन उंबऱ्या काळे व इतर पाच ते चार अनोळखी व्यक्तींनी तिचा मुलगा नाथिक खुज्या चव्हाण यासह श्रीधर चव्हाण, नागेश चव्हाण व लिंबू काळे यांचा खून केला आहे. यासाठी फिर्यादीत पूर्वीचे वाद दाखवण्यात आले आहे.
पोलिसांनी घेतलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असला तरीही या घटनेची न दिसणारी तपासाची दिशा आत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

असा रचला गेला कट
समजलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील काही व्यक्ती स्वस्तात सोने घेण्यासाठी विसापूर फाटा या ठिकाणी काही महिलांसोबत आल्याचे समजते. त्यांच्याकडे नोटांनी भरलेली बॅग होती. धरलेल्या व्यवहारात पैसे देऊन सोने घेण्याचे ठरले होते. सोन्याच्या नावाखाली ड्रॉप करण्याचा फंडा अनेक वर्षापासून श्रीगोंदा तालुक्यात सराईतपणे सुरू आहे. आपण फसले जाऊ शकतो. याची शक्यता जळगावच्या लोकांना सुरुवातीपासून असल्याने ते स्वतः तयारीत आले होते. पैसे घेऊन सोने देण्यासाठी काही व्यक्ती समोर आले आणि इतर दबा धरून बसले होते. पैशाची बॅग दिसली की ती हातातून हिसकावून पळू लागले.
त्याच वेळी सोने घेण्यासाठी आलेल्या एका उंच व्यक्तीने हातात लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढत त्याने बॅग आणि त्यावर सपासप वार केले. तो ओरडल्याने लपून बसलेले काही व्यक्ती समोर आले. त्याच्यापुढे त्यांच्यावरही सपासप वार केले. त्यानंतर इतरांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली सोने घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने लगेच जवळ लावलेल्या त्यांच्या वाहनाकडे धाव घेतली आणि तेथून पसार झाल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिसांचे एक पथक त्या आरोपींना शोधण्यासाठी जळगावच्या दिशेने रवाना झाल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.
जळगावच्या दिशेने पथके रवाना 
श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव विसापूर फाट्याजवळ स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने चार जणांचा चाकूचे वार करून निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी जळगावच्या दिशेने तपासकामी पथके रवाना केल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलिसांना एक खात्रीपूर्वक पुरावा मिळाला आहे. 
सुरेगाव विसापूर फाट्याजवळ झालेल्या हत्याकांडात चार जण जागीच ठार झाले आहेत. मात्र, घटनास्थळी पोलिसांना काहीतरी पुरावा मिळाला आहे आणि त्यावरून आरोपी लवकरच जेरबंद करणार असल्याची दबकी चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात ऐकण्यास मिळत होती. मात्र, आता पोलीस सुतावरून स्वर्ग कसा गाठतात हे काही काळातच समोर येईल, अशी जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here