Rahuri : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

0
दरोडेखोरांकडून आठ मोटारसायकल जप्त
 
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी येथे काल शुक्रवारी (दि.21) रात्री दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या सराईत गुन्हेगारांची टोळी राहुरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून गजाआड केली आहे. त्यांच्या ताब्यातून आठ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून समजली आहे.
राहुरी पोलिस ठाणे हद्दीत शुक्रवारी (दि.२१) रात्री दहा वाजण्याच्यादरम्यान शहरानजिक नगर मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीच्या पुलाजवळ काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीने संशयित रित्या फिरत आहे, अशी माहिती राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मुकुंद देशमुख यांना गुप्त खब-या मार्फत मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल, पोलिस उप निरीक्षक गणेश शेळके, हवालदार अयुब शेख, पोलिस नाईक शिवाजी खरात, संभाजी शेंडे, निलेश मेटकर, आदिनाथ पाखरे, सचिन ताजणे, श्रीकृष्ण केकाण, रंगनाथ ताके आदि पोलिस पथकाने पुलाजवळील शव विच्छेदन रूमजवळ छापा टाकला.
यावेळी पाच ते सहा इसम दोन मोटारसायकलीवर संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले. पोलीस पथकाला पाहून ते सैरावैरा पळू लागले. हे इसम मुळा नदीच्या दिशेने पळून जात असताना पोलिस पथकाने त्यांना पाठलाग करून त्यातील चार जणांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. परंतू त्यापैकी दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या चार जणांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सागर अशोक बर्डे वय २० वर्षे, राहुल पोपट आघाव वय १९ वर्षे, रविंद्र सूर्यभान माळी ऊर्फ भोंद्या वय २१ वर्षे, विनायक गणपत बर्डे वय १९ सर्व राहणार बारागांव नांदूर, तालूका राहुरी. तसेच पळून गेलेले अर्जून साहेबराव माळी व राहुल अशोक माळी दोघे राहणार बारागांव नांदुर. अशी माहिती त्यांनी सांगीतली.

यावेळी त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे एक चाकू, नायलाॅन दोरी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड, तसेच कटर आदि हत्यारे आढळून आली. तसेच त्यांनी चोरलेल्या आठ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. सदर कारवाई ही जिल्हा पोलिस प्रमुख अखिलेश कुमार, श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. दीपाली काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या सुचने प्रमाणे आणि पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पकडलेल्या चार आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हेगार हे सराईत असून मोटारसायकल चोरी, घरफोड्या असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here