शितलतरंग : ओस पडलेलं अंगण

“साफ होत चालली आहेत
           जुन्या आठवणींची जळमटं.
     पण नाही हरवलं अजुनही
          अंगणात माझं मन दडलेलं.”
आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे लुप्त होत चाललेलं आणि सर्वांच्या मनात जिव्हाळ्याचे घर करुन ठेवलेलं ते म्हणजे अंगण! अंगण हा तर सर्वांच्याच आपुलकीचा विषय. पूर्वी गावात प्रत्येक घरासमोर असायचेच. त्याच्या मध्यभागी असायची ती आपल्या संस्कृती आणि पावित्र्याचे द्योतक असलेली ‘तुळस’.
सकाळी आई लवकर उठून सडा-रांगोळी करायची. तुळशीला पाणी घालून पूजा करायची. अंगणाला खरी शोभा यायची ती आईने सारवून काढलेल्या त्या रांगोळीमुळेच. अंगणात फूलझाडांपासून फळ झाडांपर्यंत सगळीच झाडं दिमाखात डोलत असायची. देवाला वाहायला लागणारी फुले जसे मोगरा, जास्वंद, झेंडू, गुलाब, जाई-जुई ही अंगणातील बागेतूनच यायची. रात्रीच्या वेळी मन धुंद करणारी रातराणी तर मोहून टाकायची. दाणा-पाणी घेण्यासाठी चिमणी-पक्षी यांची वर्दळ नेहमीच असायची. त्यांच्या चिवचिवाटाने, किलबिलाटाने घर दणाणून जायचे.

उन्हाळयात घरात केलेली वाळवणं जसं कुरडई, पापड, सांडगे हे दरवर्षीचे अंगणात वाळत घातलेली घरोघर दिसायची. तसेच उन्हाळ्यात लाहिलाही कमी व्ह्यायची ते अंगणातील आंब्याच्या किंवा कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीनेच. अंगणात आम्ही भातुकलीच्या खेळापासून ते क्रिकेटच्या खेळापर्यंतच्या आठवणी अजूनही स्मरणात आहेत. संध्याकाळच्या वेळी अंगणाच रुप अधिकच लुभावणारं असतं. सुर्यास्तावेळी आरामखुर्चीत मंदगार वा-यात बसून चहा घ्यायची मजा काही औरच!

रात्रीच्या वेळी पडणारं टपोरं चांदणं. या चांदण्याच्या शितल प्रकाशात जेवणाची मजा. रंगणा-या गप्पा, गाण्याच्या भेंड्या, मौज मस्ती, ही अंगणातील सानिध्यातील एक अनुभव देणारा. सण समारंभाला देखील अंगणाचं वैशिष्टय जपले जाते. गुढीपाडव्याला गुढी उभारून, तर दिवाळीत पणत्यांच्या प्रकाशाने अंगण उजाळून जाते.

घराची शोभा वाढते ते अंगणामुळेच. नव्हे घर ओळखाले जाते तेच अंगणावरुन. अंगण प्रसन्न तर घर प्रसन्न! असं हे घराचं आणि अंगणाचं आतूट नातं. आजकाल घर बांधताना ह्याचा विचारच केला जात नाही. आज गावातही शहराचे अनुकरण केले जात असून अंगण आता केवळ नावापुरतेच उरले आहे.

अंगण ही कल्पना नसून ते भारतीय संस्कृतीचं वैभव व वास्तव आहे. अंगणाच्या कुशित लहान मुलांच्या रांगण्यापासून, सणावरांचे सोहळे, विवाह समारंभ ते अंत्यविधीपर्यंत सगळे सामावलेले असते. असे हे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचे, विसाव्याचे, विरंगुळ्याचे अंगण मनात ओस पडलंय. आता अंगण फक्त आठवणीतच उरलंय…

शितल ग. मलठणकर, चित्ते, पुणे (९८५०८८८४०४)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here