Editorial : दुफळी

एक खोट लपविण्यासाठी अनेक खोट्यांचा आधार घ्यावा लागतो. इंग्रजीत एक म्हण आहे, तिचा अर्थ चुकले तर वाईट वाटून घेऊ नका; परंतु त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करू नका. काँग्रेस मात्र त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करीत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर कोणीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला नव्हता. अखेर राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तरीही गेल्या वर्षभरात तेच एकमेव नेते असे आहेत, की त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सातत्याने आवाज उठविला. विरोधी पक्षाची जबाबदारी ते एकट्याने निभावत आहेत.

अर्थव्यवस्था, बेरोजगारी, मंदी, कोरोनावरच्या उपाययोजना, चीनचे आक्रमण आदीवरून ते मोदी यांना लक्ष्य करीत आहेत. त्यांनी राजीनामा देतानाच पक्षाध्यक्षपदी गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीची निवड करावी, असे म्हटले होते. प्रियंका गांधी यांनीही त्यांचे मत उचलून धरले होते. तात्पुरती सोय म्हणून सोनिया गाधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. श्रीमती गांधी आजारी आहेत. त्यांना मर्यादा आहेत. तरीही त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले. देशातील विरोधी पक्षांना एकत्र करण्यात अजूनही सोनिया यांची भूमिका महत्त्वाची असते. सोनिया यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारून दहा आॅगस्टलाच एक वर्ष पूर्ण झाली.  त्याअगोदरच काँग्रेसच्या २३ नेत्यांनी पत्र पाठवून काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष देण्याची आणि सर्वमान्य नेतृत्व असावे आणि अशा नेत्याची निवड मतदानाद्वारे व्हावी, अशी मागणी करताना या नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. त्यातही संजय झा यांनी अगोदर या पत्राचा भांडाफोड केला, तेव्हा असे कोणतेही पत्र पाठविले नसल्याचे पक्षातून सांगण्यात आले; परंतु कार्यकारी समितीच्या बैठकीच्या अगोदरच्या दिवशी ते पत्र फूटलेच. त्यामुळे पक्ष तोंडघशी पडला. खासदार शशी थरूर यांनी जाहीरपणे या पत्रातील संबंधित मुद्दे मांडले होते. विशेष म्हणजे पत्र पाठविणारे नेते कुणी सामान्य नाहीत. त्यांच्या पत्राला सोनिया यांनी स्वतःच उत्तर दिले. राजीनामा देण्याची तयारी दाखविली. त्याबाबतचे वृत्तही आले, तरी ते चुकीचे आहे, असे सांगण्याचा काहींनी प्रयत्न काहींना केला. राहुल आणि प्रियंका यांनी पक्षाध्यक्षपदावरून भूमिका स्पष्ट केली असताना गेल्या काही महिन्यांपासून राहुल यांच्या समर्थकांनी काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल यांच्याकडे देण्यासाठी मोहीम उघडली होती. आता काँग्रेसच्या नेत्यांचे पत्र हे लेटर बाँब ठरले असून त्यातून काँग्रेसमध्ये मोठी दुफळी माजली आहे. महाराष्ट्रातील एका नेत्याने त्यावरून तर अन्य ज्येष्ठ नेत्यांची लाज काढली आहे. त्यावरून दुफळी कोणत्या स्तरापर्यंत गेली आहे, हे लक्षात यायला हरकत नाही.

 काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद वाढला आहे. काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री सुनील केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. काँग्रेसमध्ये दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल झाले पाहिजेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिले. त्यात या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या नावाचा समावेश आहे. यानंतर केदार यांनी या तिन्ही नेत्यांवर बोचरी टीका केली आहे. काँग्रेसने गटबाजीतून देशाची सत्ता गमविली. राहुल गांधी यांच्या प्रयत्नांनी ज्या राज्यात सत्ता आली, तेथील सत्ताही गटबाजीने गमवावी लागली. असे असतानाही काँग्रेसजण अजून सुधारायला तयार नाहीत. केदार यांनी आता जी भाषा वापरली आहे, त्यावरून पक्षात कशी बेकी आहे, हे जनतेला दिसते. गांधी कुटुंबीयांवर प्रश्न उपस्थित करणा-यांना पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी. माफी मागितली नाही तर हे तीन नेते राज्यात कसे फिरतात, ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला. गांधी घराण्याचे नेतृत्व असेल, तरच काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकतो. सोनिया यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असे ट्विट केदार यांनी केले आहे. केदार यांच्याआधी संजय निरुपम यांनीही अशाप्रकारे पत्र लिहिणाऱ्यांवर टीका केली होती. हे पत्र म्हणजे राहुल यांच्या नेतृत्त्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. आतापर्यंत बंद खोलीत रचले जाणारे षडयंत्र या पत्रामुळे समोर आले आहे. याला केवळ एकच उत्तर आहे. राहुल यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याचा हट्ट सोडून द्यावा आणि विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सुरू असलेली पडझड थांबवावी. काँग्रेसला केवळ तेच वाचवू शकतात, असे निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  सोनिया पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायच्या तयारीत असल्याच्या वृत्ताचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खंडन केले आहे. दुसरीकडे सोनिया यांनीच पक्षाचे अध्यक्ष असावे. त्या तयार झाल्या नाहीत, तर राहुल यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी करणारा ठराव महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी राहुल यांनी अध्यक्ष व्हावे, अशी मागणी केली आहे. थोरात यांनी राहुल यांना पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी पत्र लिहिले आहे. ‘कम बॅक राहुलजी’ अशी साद त्यांनी घातली आहे.

सोनिया यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी पुढे कोण घेणार असा प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. याबद्दल पक्षात दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. काँग्रेसचा अध्यक्ष गांधी कुटुंब सोडून इतर कोणी असले पाहिजे, असे राहुल आणि प्रियंका  यांनी आधीच म्हटले होते; परंतु राहुल यांनी पुढे येऊन पक्षाची जबाबदारी सांभाळावी, असे पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते वारंवार बोलत आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राहुल यांना पत्र लिहून पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी गांधी काँग्रेसमधील नेतृत्वाला आव्हान देणा-या नेत्यांचा विरोध केला आहे. हा मुद्दा उपस्थित करण्याची ही वेळ नाही. नेतृत्वाबाबतचा निर्णय घेण्यासाठी गांधी कुटुंब समर्थ आहे. जोपर्यंत सोनिया यांची इच्छा आहे, तोपर्यंत त्यांना नेतृत्िव करू द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसला अशा नेतृत्वाची गरज आहे, जी केवळ काही लोकांसाठीच नव्हे तर संपूर्ण पक्षासाठी, सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि देशासाठी मान्य असेल. राजस्थानमधील काँग्रेसमधील गटबाजी अजूनही संपलेली नाही, हे राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी झालेल्या घटनेतून स्पष्ट झाले. आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिल्याची बातमी अविश्वसनीय आहे. जर हे सत्य असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे, असे म्हटले आहे. सोनियांनी या अडचणीच्या काळात पक्षाचे नेतृत्व केले पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी लढा आहे. सोनिया नेहमीच या आव्हानांना तोंड देत असतात; पण जर त्यांनी अध्यक्षपद सोडण्याचा विचार केला असेल, तर राहुल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, असा माझा विश्वास आहे. दुसरीकडे सचिन पायलट यांनी राहुल यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचा आग्रह धरला आहे. काँग्रेस नेते अश्विनी कुमार यांनी पत्राच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने पत्र लिहिल्यामुळे शंका निर्माण होतात. यातील काही नेत्यांनी पक्षाचे वारंवार नुकसान केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. केवळ एक वर्षापूर्वी सर्व नेते सोनिया यांना पक्षाच्या ताकदीचा ताबा घेण्याचा आग्रह करत होते. आता त्यातील काही लोक त्याच्या नेतृत्वावर प्रश्न विचारत आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे म्हटले आहे. निवडणुकांऐवजी पक्षाने एकमताने संधी द्यावी, असे सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर एआयसीसीचे सचिव चल्ला वामशीचंद रेड्डी यांनी राहुल यांना पक्षाध्यक्षपद देण्याची मागणी केली. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही राहुल यांना संधी देण्यासाठी राहुलच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लढू शकतात, असे म्हटले आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्येच दुफळी तयार झाली असून त्यातून पक्षाचेच नुकसान आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here