सहायता एज्युकेशन सोसायटीतर्फे कोविड योद्ध्यांचा सत्कार संपन्न

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
येथील सहायता एज्युकेशन अॅन्ड वेल्फेअर सोसायटी वतीने चेअरमन मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन यांच्या हस्ते कोरोना काळात समाजाची निर्भीड सेवा करणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे इयत्ता बारावीच्या परीक्षेत सुयश संपादन केलेल्या शहरातील विविध शाळातील विद्यार्थ्यांना सुद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उम्मती कॉम्प्यूटर सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुफ्ती रिजवान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक बॅंकेचे संचालक सलीमखान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सुरवडे, वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. वाय.के. शेख, अॅड .आरिफ शेख उपस्थित होते.
याप्रसंगी मुफ्ती रिजवान यांनी समाजातील डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस विभाग, नगरपालिका कर्मचारी इत्यादी वेगवेगळ्या घटकांनी कोरोना काळात केलेल्या समाजसेवेबद्दल प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गौरव करून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. तसेच इयत्ता बारावीमध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यातही चांगली प्रगती करावी असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.
 शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी आगामी काळामध्ये कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता छोट्या-छोट्या मीटिंग घेऊन घराघरांमध्ये कोरोना विषयक जागृती करण्यासाठी या संस्थेने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
डॉ. मुश्ताक निजामी यांनी कोरोनाची भीषणता पाहता लोक त्याला फार सहजतेने घेत आहेत परंतु विशेष काळजी घेतली नाही तर नोव्हेंबरपर्यंत हे गंभीर रूप धारण करील त्यासाठी नागरिकांनी याला सहजतेने घेऊ नये असे आवाहन केले. यावेळी कोरोना काळात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल सहायता एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे नगराध्यक्षा अनुराधा आदिक, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वसंत जमधाडे, डॉ. तौफिक शेख, डॉ. मुश्ताक निजामी, डॉ. रियाज पटेल, हाजी जलीलभाई काझी, उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला, उपाध्यक्ष फिरोज पठाण, नगरसेवक मुक्तार शहा, कुरेशी जमातचे अध्यक्ष महबूब कुरेशी, आदिल मखदुमी, जमील शरीफ कुरेशी तसेच विशेष कार्याबद्दल सुलतान नगर फाऊंडेशनचे रशीद खान यांचा मुफ्ती रिजवान यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे बारावी परीक्षेमध्ये सुयश संपादन केलेले विद्यार्थी महेंद्र भिंगारदिवे, अजहर युसुफ शाह, अजय शिंदे, सोनल पगारे, नुजहत बिलाल शाह, शहेजीन साजिद शेख, नुजहत इरफान पठाण यांचा देखील गौरव करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीमखान पठाण यांनी केले तर आभार अॅड . आरीफ शेख यांनी मानले . कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सामाजिक अंतराचे भान ठेवून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here