Editorial : ना खाता ना बही, राहुल कहे वही सही!

स्वातंत्र्योत्तर काळात एवढी वर्षे सत्तास्थानी राहिलेल्या काँग्रेसची अवस्था सध्या दिशाच गवसत  नसलेल्या समुद्रात हरवलेल्या जहाजासारखी झाली आहे. पराभवाने ती खचून गेली आहे. लोकसभा निवडणुकीतील दोन पराभवाने ती विकलांग झाली आहे. जनतेत स्थान असलेल्या नेत्यांचे पंख छाटण्याची आणि दरबारी राजकारण करणा-यांना महत्त्व देण्याची कृती काँग्रेसला चांगलीच महागात पडली आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हाही त्यांनी गांधी कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीने अध्यक्षपद स्वीकारावे, असे म्हटले होते. प्रियंका गांधी याही भावाच्या मताशी सहमत होत्या. तरीही काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही.

भाजपचे आव्हान पेलण्याची क्षमता कुणातही नाही, हे त्याचवेळी स्पष्ट झाले. पक्षात अनेक नेते आहेत, विचारवंत आहेत; परंतु मोदी यांना समर्थ पर्याय होईल, असा त्यातील एकही नाही. देशभरातील काँग्रेसजणांना एकसंघ ठेवील, त्यांच्यात चैतन्य निर्माण करील, अशी धमक एकातही नाही. त्यातही धर्मनिरपेक्षता, की साैम्य हिंदुत्त्व या वैचारिक गोंधळात काँग्रेस आणखी दिशाहीन झाली. अन्य कुणी नेतृत्व स्वीकारायला पुढे आले नाही, म्हणून काँग्रेसच्या कारकीर्दीत सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधी यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आली. गेले वर्षभर त्याच पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत. असे असले, तरी त्यांचे वय, त्यांचे आजारपण यामुळे त्या पक्षाला न्याय देऊ शकल्या नाहीत. जेव्हा सोनिया यांची निवड झाली, तेव्हाच पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याचे ठरले होते; परंतु वर्षभर काहीच झाले नाही. गेल्या वर्षभरात अधूनमधून पक्षातील त्रुटी अनेकांनी मांडल्या.

जनसामान्यांत वावरणा-या आणि सर्वसमावेशक नेतृत्वाकडे पक्षाची जबाबदारी सोपवण्याचा तसेच राहुल गाधी यांनी म्हटल्याप्रमाणे पक्षाच्या सर्वंच स्तरावरील पदाधिका-यांच्या निवडणुका घेण्याची मागणी पक्षातील २३ नेत्यांनी केली. खरे तर ही मागणी पहिल्यांदाच केली असेही नाही. गेल्या महिन्यात खासदार शशी थरूर यांनीही हीच मागणी केली होती. काँग्रेसने बहिष्कृत केलेल्या संजय झा यांनी असे पत्र सोनिया यांना पाठवल्याचा गाैप्यस्फोट केला. तेव्हा काँग्रेसने ते नाकारले. नंतर हे पत्र माध्यमांत प्रसिद्ध झाले. त्यानंतर सोनिया यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली; परंतु ते वृत्तही काँग्रेसने फेटाळले. त्यामुळे काँग्रेसचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला गेला. काँग्रेस किती गोंधळलेली आहे आणि वस्तुस्थितीपासून ती कसा पळ काढते आहे, हे त्यामुळे उघडकीस आले आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या सात तास चाललेल्या बैठकीतून नवा अध्यक्ष निवडला गेला नाही; परंतु काँग्रेस किती दुभंगलेली आहे, हेच चित्र पुढे आले. सोनिया रुग्णालयात असताना हे पत्र पाठविण्यात आले. पत्राची वेळ कदाचित चुकलेली असेल; परंतु त्यातील मुद्दे तर जुनेच होते. त्यामुळे राहुल यांनी संतप्त व्हायचे काहीच कारण नव्हते.

गेले वर्षभर सोनिया हंगामी अध्यक्ष असल्या, तरी सारी सूत्रे राहुलच सांभाळीत होते आणि कर्नाटक, मध्य प्रदेशातील सत्ता जाण्यास तेच कारणीभूत ठरले. राजस्थानमधील सत्ता वाचली असली, तरी तेथे पक्षात उभी फूट पडली आहे. सचिन पायलट यांनी जेव्हा दिल्लीत येऊन काही मागण्या केल्या, तेव्हा कपिल सिब्बल यांनीच त्यात लवकरलॉ लक्ष घालण्याची मागणी केली होती. ३२ दिवस त्यांच्यांशी चर्चाच केली नाही. काँग्रेसच्या दुभंगलेपणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. काँग्रेस वाचवायची असेल, तर तिने चुका दुरुस्त करून जनतेच्या प्रश्नावर आक्रमक व्हायला हवे. येथे तर पराभवामागून पराभव होत असताना काँग्रेसला साधे आत्मचिंतन करता येत नाही.

वर्षभर त्याबाबत अनेकदा मागणी करूनही पक्षश्रेष्ठी त्यात लक्ष घालायला तयार नाही. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत पुन्हा सोनिया यांच्याच गळ्यात हंगामी अध्यक्षपदाची माळ पडली. पक्ष मोठा, की कुटुंब याचा निर्णय घेण्यात कार्यकारी समितीला अपयश आले. पक्षात सोनियांचा एक आणि राहुल यांचा एक असे दोन गट असल्यावर शिक्कामोर्तब झाले. राहुल यांनी ‘पत्र’कार नेत्यांची संभावना भाजपशी हातमिळवणी केलेले नेते, अशी केल्याने ज्येष्ठ नेते दुखावले गेले. सिब्बल आणि गुलाब नबी आझाद यांच्या प्रतिक्रिया त्याच स्वरुपाच्या होत्या. या दोघांवर तरी कुणीही भाजपच्या हातचे बाहुले असल्याचा आरोप करू शकणार नाही, इतकी त्यांची निष्ठा वादातीत आहे. असे असताना अंबिका सोनी यांनी २३ नेत्यांवर कारवाई करण्याचा आग्रह धरला. खरेतर या नेत्यांनी पक्षविरोधी कृत्य केलेले नाही. राजस्थानमध्ये पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बंड केलेल्या नेत्यांवर कारवाईचे धाडस दाखवू न शकलेली काँग्रेस येथे मात्र पक्षाच्या हितासाठी काही सुचविले, तर त्यांच्यावरच कारवाई करण्याचा आग्रह धरीत असेल, तर कोठेतरी चुकते आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

आझाद यांनी आरोप सिद्ध झाला, तर राजीनाम्याची तयारी दाखविल्यानंतर राहुल यांना आपण या नेत्यांचा भाजपशी संबंध असल्याचे बोललोच नाही, असे सांगावे लागले. सिब्बल यांनीही त्यानंतर आपले ट्विट मागे घेतले असले, तरी मने दुभंगलेलीच राहिली. आतापर्यंत पक्ष नेते हे समजू शकले नाहीत, की कुटुंब आणि पक्ष वेगवेगळे आहेत आणि नेते, कार्यकर्ते पक्षासाठी आहेत. कुटुंबासाठी नाहीत? कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल यांनी ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केला, त्यावरून हे दिसून येते की कुटुंब हा पक्ष आहे, असा राहुल यांनाही फाजील आत्मविश्वास आहे.

काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची प्रत राहुल यांनी जाहीरपणे फाडली होती, यावरून ते ज्येष्ठ नेत्यांचा किती सन्मान करतात, हे जगाने पाहिले होते. राहुल यांना अध्यक्ष करण्यासाठी त्यांचे समर्थक सरसावले आहेत. सरकारविरोधात आणि मोदी यांच्याविरोधात राहुल एकाकी लढत आहे, हे ही मान्य आहे; परंतु याचा अर्थ ज्येष्ठ नेत्यांचा प्रत्येक वेळी अवमान करावा, असेही नाही. राहुल यांच्या समर्थकांनी पक्षात 30-40 वर्षे सेवा बजावत असलेल्या नेत्यांचा अवमान केला आहे. खासदार राजीव सातव यांनी गेल्या महिन्यांत ज्येष्ठांविरोधात जे वक्तव्य केले, ते कशाचे द्योतक होते? एरव्ही उठसूठ ट्वीट करणा-या राहुल यांना पक्षाच्या सात तास चाललेल्या बैठकीबाबत आणि त्यातील वाद-विवादावर उठलेल्या वावटळीवर काहीच भाष्य करू नये, याला काय म्हणायचे?

गांधी घराण्याच्या इच्छेनुसार आणि आशीर्वादाशिवाय काँग्रेसमध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही, असा एक समज आहे आणि तो अशा प्रकारातून दृढ होतो. राहुल एका वर्षापेक्षा जास्त काळ पक्षाध्यक्ष राहिले नाहीत. त्यांच्याकडे पक्षात कोणतीही जबाबदारी नाही; परंतु अजूनही त्यांचाच शब्द पक्षांत अंतिम असतो. पक्षाने जनाधार गमावला आहे. पक्षात पडलेले दोन गट सोनिया आणि राहुल यांच्याशिवाय अन्य कोणाचा अध्यक्षपदाशिवाय विचार करायला तयार नाही. गांधी कुटुंब हीच एक शक्ती आहे, असे मानले जात असून एका कुटुंबाभोवती पक्ष फिरत राहणे हे लोकशाहीसाठी चांगले नाही. २३ नेत्यांच्या पत्राबद्दल सोनिया यांनी आपली कोणतीही भावना नाही, असे सांगितले; परंतु अहमद पटेल, अंबिका सोनी यांच्या प्रतिक्रिया पाहता या २३ नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत कायम आहेत.

सीताराम केसरी काँग्रेसमध्ये अध्यक्ष होते. त्याअगोदर ते खजिनदार होते. कुणी हिशेब मागितला, तर ते म्हणायचे, ‘ना खाता ना बही, केसरी कहे वही सही!’ सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर सीताराम केसरी यांना बाहेरचा रस्ता धरला. आताही राहुल यांना कुणालाही उत्तरदायी व्हावे असे वाटत नाही. सध्याची परिस्थिती पक्षासाठी अत्यंत जटिल बनत आहे. पक्षाचे अनेक नेते राहुल यांना पुन्हा अध्यक्ष करण्यासाठी आग्रही आहेत. राहुल यांना पुन्हा पक्षाध्यक्ष करायचे असेल, तर त्याला हरकत नाही; परंतु त्यांनी गेल्या वर्षी राजीनामा देताना जी भूमिका मांडली होती, तिचे काय? गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष असावा, असा त्यांचा आग्रह होता त्याचे काय? पक्षातील काही नेते अजूनही पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही चांगली गोष्ट आहे; परंतु ती समजून घेण्याची ताकद पक्षश्रेष्ठीत असायला हवी. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here