Shrigonda : कुकडी कारखाना यंदाचा हंगाम ताकदीनिशी करणार – राहूल जगताप

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – अडचणी आणि संघर्षातून कुंडलिकराव जगताप (तात्या) यांनी कुकडी कारखान्याची उभारणी केली. कुकडी पट्ट्यातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना देण्यासाठी त्यांनी कसलीही पर्वा केली नाही. शेतकरी सुखाचे त्यांनी पाहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी जीवाचे रानन करीत आहोत. त्यामुळे यंदाचा हंगाम ताकतीनिशी करु, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार राहूलदादा जगताप यांनी व्यक्त केला. 

कर्मयोगी कुंडलीकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे मशिनरीचे गुरुवारी (दि. 27) सकाळी 11.00 वा. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप पा. व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सामाजीक कार्यकर्ते  विलासराव दिवटे व संचालक मंडळ यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.
गळीत हंगाम 2020-2021 ला सामोरे जात असताना कारखाना संचालक मंडळाने 9.00 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे मशिनरी व सहवीज निर्मिती प्रकल्पाचे ओव्हरव्हॉलींगची कामे पूर्ण होत आलेली आहेत. त्याचबरोबर ऊसतोडणी व वाहतुकदारांचे करार पूर्ण करुन हप्ते वाटपही देण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना चेअरमन माजी आमदार राहुल जगताप पा. यांनी सांगितले येणारा गळीत हंगाम कोरोना पार्श्वभूमीवर अत्यंत आव्हानात्मक असून येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करून कारखाना पूर्णक्षमतेने गाळप करणार असून, 9.00 लाख मे.टन. गाळपाचे उद्दिष्टे ठेवलेले आहे. तसेच या हंगामात सहवीज निर्मिती प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने चालवणार आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती व ऊसाअभावी तालुक्यातील सर्वच कारखाने बंद राहिले होते. परंतू परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड कारखान्याच्या कार्यक्षेत्रात व तालुक्यात झालेली असल्याने या हंगामामध्ये 22.00 लाख मे. टनाच्या आसपास ऊस उपलब्ध होणार आहे.
साखरउद्योग मागील ४ ते ५ वर्षापासून आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. यावर्षी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने एफ.आर.पी. मध्ये रु. 100.00 वाढ  झालेली असल्याने खर्च आणि उत्पन्न यांच्या मध्ये रु. 300 ते 400 च्या आसपास तफावत पडत असून, ही तफावत दूर करावयाची असल्यास केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किमंत रु. 31.00 वरुन रु.36.00 करणे गरजेचे आहे. कारण मागील १० वर्षामध्ये एफआरपीमध्ये दुपटीने वाढ झाली. परंतू साखरेचे दर वाढले नसल्याने बहुतेक कारखान्यांना मोठा तोटा सहन करुन, कर्ज काढून एफआरपी द्यावी लागली. त्यामुळे केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करुन कारखान्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी साखरेला आधारभूत किमंतीत कमीत कमी रु. 36.00 द्यावी, अशी मागणी राहुल जगताप पा. यांनी केली.

कारखान्याला 60 केएलपीडीचे लायसन मिळाले असून, येणाऱ्या काळामध्ये लवकरच इथेनॉल प्लॅंटची उभारणी करणार आहोत. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना जादा भाव देण्यास मदत होईल. कारखान्यातील कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्यानुसार पगारात रु. 2700.00 प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर साखर कारखानदारीला झटका बसला असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ऊसतोडणी व वाहतुकदार तसेच कामगार, शेतकरी यांची कारखाना साईटवर आरोग्याची काळजी घेण्यात येणार असून त्यादृष्टीने कारखाना तयारी करत असून दैनंदीन जीवनामध्ये प्रत्येकानेच तोंडाला मास्क वापरणे सामाजिक अंतराचे पालन करणे तसेच स्वतः बरोबर दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब उगले, मा. उपाध्यक्ष विश्वास थोरात, जेष्ठ संचालक विवेक पवार, अंकुशराव रोडे, प्रल्हाद इथापे, कचरुमामा मोरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड, कामगार संघटनेचे अध्यक्ष कल्याणपाटील जगताप, प्रोडाक्शन मॅनेजर अनिल कुमार, मुख्य अभियंता भास्करराव काकडे तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here