Shrigonda Crime : अपहरण झालेल्या ‘त्या’ व्यापाऱ्याची अवघ्या काही तासातच सुटका

अपहरणकर्त्यांना अटक, श्रीगोंदा पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री  

अवघ्या तीस हजार रुपयांसाठी श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील कांदा व्यापारी ज्ञानदेव उर्फ माऊली मनसुक लांडगे यांचे कर्नाटक राज्यातील काही लोकांनी अपहरण केल्याची घटना दि २७ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरात घडली. श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपहरण झाल्यानंतर अवघ्या काही तासातच अपहरण झालेल्या कांदा व्यापाऱ्याची सुटका करत अपहरणकर्ते पोलिसांनी पकडले आहेत.

या घटनेबाबत अपहरण झालेल्या लांडगे यांचे बंधू सोन्याबापू लांडगे यांच्या फिर्यादीवरून कर्नाटक येथील व्यापारी एच एम बागवान व त्याचे सोबत असलेले अनोळखी चार ते पाच इसम यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भावडी येथील ज्ञानदेव लांडगे हे कांदा व्यापारी असून कर्नाटक येथील व्यापारी एच एम बागवान याने कांदा व्यापारासाठी चार ते पाच दिवसांपूर्वी लांडगे यांच्या खात्यावर उचल म्हणून एक लाख रुपये टाकले होते. आज दि27 रोजी सकाळी सोन्याबापू लांडगे यांनी उचल पोटी घेतलेल्या एक लाखापैकी 70 हजार रुपये बागवान याला दिले. 30 हजार रु थोड्यावेळाने देतो, असे सांगितले.

त्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा शहरातील आर के इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरून कर्नाटक येथील व्यापारी बागवान याने व त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या इर्टीका गाडी क्र केए 20 झेड 6509 यामध्ये ज्ञानदेव लांडगे यांना बेकायदेशीरपणे कैद करून पळवून नेले. त्यानंतर सोन्याबापू यांना फोन करून 30 हजार रुपये नही दिये तो हम उसको नही छोडेंगे हम उसको कीडनॅप करके कर्नाटक ले जायेंगे, असे सांगितले.

त्यानंतर सोन्याबापू लांडगे यांनी तत्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक जाधव यांना घडलेला प्रकार सांगितला जाधव यांनी सायबर सेलच्या मदतीने अपहरणकर्त्यांचे मोबाईल लोकेशन घेत दौंड पोलीस निरीक्षक महाडिक याना संपर्क साधत अपहरणकर्त्यांची माहिती दिली. परंतु तोपर्यंत अपहरणकर्ते इंदापूरच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक जाधव यांनी इंदापूर पोलीस निरीक्षक सारंगधर यांच्याशी संपर्क साधला. इंदापूर पोलिसांनी हायवेला सापळा लावून एका टोलनाक्यावर या अपहरण कर्त्यांची गाडी अडवून अपहरणकर्ते ताब्यात घेत अपहरण झालेले ज्ञानदेव लांडगे यांची सुटका केली. श्रीगोंदा पोलिसांचे एक पथक इंदापूरकडे रवाना झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here