राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राकडून कीड-रोग सर्वेक्षणासाठी श्रीगोंदा तालुक्याची निवड

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांच्याकडून डाळिंब पिकावरील कीड रोग सर्वेक्षणसाठी श्रीगोंदा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये डाळिंब पिकाचे जवळपास चार हजार हेक्टर क्षेत्र आहे. सद्यस्थितीत डाळिंब पिकावरील विविध कीड रोगांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते म्हणून तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांच्याशी चर्चा करून संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी श्रीगोंदा तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर काही गावांमध्ये डाळिंब पिकावरील कीड रोगाचे सर्वेक्षण करावे अशी विनंती केली, यानुसार राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील दोन शास्त्रज्ञ दिनकर चौधरी व विजय लोखंडे यांनी काल तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा यांची भेट घेऊन डाळिंब पिकाची सद्यस्थितीबाबत माहिती घेतली तसेच आज श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी,बोरी, वेळू येथील काही शेतकऱ्यांच्या डाळिंब पिकावरील कीड व रोगांबाबत बाबत सर्वेक्षण केले.
येथून पुढे  हे सर्वेक्षण टप्याटप्प्या नुसार होणार आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने “डाळिंबावरील तेल्या रोग नियंत्रणाच्या सोप्या सहा पायऱ्या” हे तंत्रज्ञान विकसित केले असून राज्यात या पद्धतीने अनेक ठिकाणी तेल्या रोग नियंत्रणात मदत झाली आहे.
ऑगस्ट महिना संपूर्ण वर्षांमध्ये कीड-रोग निरीक्षण व सर्वेक्षणासाठी सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यांमध्ये हवेची आद्रता 60 टक्के पेक्षा जास्त असते. तसेच तापमान हे ३२ डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असते. यामुळे या महिन्यांमध्ये डाळिंब पिकावर जास्तीत जास्त रोग दिसून येतात. स्कॅब, सर्कोस्पोरा,अल्टरनेरिया, मर रोग तसेच तेल्या रोग इत्यादी रोगांची निरीक्षणे घेतली जातात. म्हणून राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या मदतीने तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा यांनी ही कीड सर्वेक्षण मोहीम आखली असून येथून पुढे  डाळिंब पिकावरील कीड रोग निरीक्षणे घेऊन त्याआधारे तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्ला प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के  यांनी दिली.
राज्यामध्ये इतर पिकांसाठी कीड-रोग सर्वेक्षण प्रकल्प चालू असून या अंतर्गत कापूस ज्वारी मका तूर सोयाबीन या पिकांच्या कीड-रोग बाबत कृषी विभागाकडून निरीक्षणे ऑनलाईन पद्धतीने नोंदवली जात आहेत. याच धर्तीवर डाळिंब पिकावरील कीड रोग निरीक्षणे घेतल्यामुळे तसेच यामध्ये हे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचा समावेश असल्यामुळे डाळिंब पिकावरील कीड रोग नियंत्रण होण्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.
या सर्वेक्षण वेळी शास्त्रज्ञा समवेत तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ म्हस्के, आबासाहेब भोरे मंडळ कृषी अधिकारी, सुरेश खंडाळे कृषी पर्यवेक्षक, किरण घोडके, बाळकृष्ण बनकर कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here