Shrirampur : अगोदर ज्ञानमंदिरे उघडण्याची गरज-बाळासाहेब पटारे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

स्वतःला प्रातिनिधिक समजणाऱ्या राजकीय पक्ष संघटनांकडून नियोजनपुर्वक शाळा, महाविद्यालये व विविध शैक्षणिक संस्था कश्या सुरु होतील यासाठी आग्रही राहणे गरजेचे आहे. मात्र, केवळ भावनिक मुद्दा मोठा करून मंदिरे उघडण्याला प्राथमिकता देणे अतिशय दुर्दैवी आहे, असे मत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी व्यक्त केले आहे.

श्रीरामपूर – कोविड-१९ च्या निमित्ताने लॉक-अनलॉकच्या सरकारी खेळात सर्वाधिक नुकसान कोणत्या घटकांचे झाले असेल तर ते शेतकरी व शालेय विद्यार्थी यांचे झाले आहे. जागतिक आरोग्य संघटना(WHO)व आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा व त्यांच्यापासून संसर्गाचा धोका सर्वात कमी आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांना उचित धेय्य व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील प्रत्येक क्षण अतिशय मोलाचा आहे.

आज विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे व अस्थिरतेचे वातावरण आहे. अशावेळी सरकारकडून आश्वासक वातावरण तयार करणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येण्याची दाट शक्यता आहे, अशा पार्श्वभूमीवर एकंदरीत कार्यपद्धती पाहता सत्ताधारी व विरोधी पक्ष या दोघांनीही शेतकरी व विद्यार्थी या दोन घटकांच्या आयुष्याचे मातेरे करण्याचे ठरवले असल्याचेच चित्र निर्माण झाले आहे.

या अस्थिर परिस्थितीत राज्यकर्त्यांनी आपापले पक्ष-संघटनांची विचारधारा बाजूला ठेऊन समाजाचे एक जबाबदार घटक या नात्याने स्वतःचे आत्मचिंतन करावे, म्हणजे काय केले पाहिजे याचे उत्तर आपोआप मिळेल असे आवाहन त्यांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here