प्रस्थापित उडतसे आकाशी

2

शासकीय नोकरीत एक नियम आहे. एखादा सेवक सेवेत असतांना मृत्यू पावला तर त्याच्या वारसाला प्राधान्याने नोकरीत घेतले जाते. याला ‘अनुकंपा तत्व’ म्हणतात. या अनुकंपा तत्वाची लागण आता सहकार क्षेत्रात झाली असून प्रस्थापित सहकारी संस्थांचे नेते (नाईलाजाने) निवृत्त होत असले, तरी त्यांनी आपल्या वारसांच्या हाती कारभार सोपविण्याचा सपाटा लावला आहे.
सहकारी संस्थांना अज्ञान पालनकर्त्याची (अपाक) संपत्ती मानली जाते. याचाच अर्थ जे या संस्थांचे खरे पालक असणारे सभज्ञसद आहेत ते या नेतृत्वाने ‘अज्ञान’ ठरविण्यात यश मिळविले आहे. सभासद अज्ञान ठेवायचा, त्याला लाचार बनवायचा आणि स्वत: ‘पालनकर्ते’ बनवायचे अशी सहकाराची न्यारी रित आहे. आता याबाबत सहकार महर्षींना दोष देता येणार नाही. बिचारे रात्रंदिवस गृहप्रपंच सोडून जनसेवा करतात. अगदी सकाळपासून तर थेट रात्रभर ही सेवा विनाखंडीत सुरु असते. या सेवेच्या मोबदल्यात या पालनकर्त्यानी ‘अपाक’ च्या इस्टेटीतून थोडं फार काही उपभोगलं तर त्यात चूक काय आहे? तुम्हीच सांगा अहो स्वत:च्या सज्ञानाची इस्टेट सांभाळायला कुणी धजत नाही तिथं हे महर्षी अज्ञानाची इस्टेट जतन करीत असतील तर हे थोरपण मानलं पाहिजे!
‘अपाक’ ची प्रॉपर्टी सांभाळायची म्हणजे लुंग्या सुंग्याचं काम नाही. तिथं जातीचेच लागतात. आता जातीचे म्हणजे नेमके काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. तर त्याचं असं आहे, सध्या राखीव जागांचा जमाना आहे. जातीनिहाय जागा राखीव ठेवल्या जातात. तशी ’सहकार महर्षी’ ही एक ‘ जात असून तमाम सहकारी क्षेत्र त्यांच्यासाठी ‘राखीव’ ठेवण्यात आलं आहे.
प्रत्यक्षात आता या जातीलाच आपण हात घालू. आय मीन ही जात कशी असते ते समजावून घेऊ. या जातीचे लोक साधारणपणे जेथे ऊस किंवा दूध पिकते अशा भागात सापडते. या जातीचे लोक दिसायला अत्यंत साधे असतात. खादीचं धोतर, खादीचा डगला आणि डोक्यावर गांधी टोपी उही या जातीच्या लोकांची खासियत. कायम ऊसाच्या सान्निध्यात राहिल्यानं यांच्या सर्वांगाला ‘हिरवेपण’ आणि दूधात वावरत असल्यास ‘दूधाळपण’ हे या जातीचे गुणवैशिष्ट्य आहे.
तसे या जातीचे लोक अत्यंत त्यागी मानले जातात. त्यागी या अर्थाने की, हे एखाद्या संस्थेत शिरले किंवा घुसले की घरदार विसरुन जातात. गृहप्रपंचाचा त्याग करुन हे संस्थेलाच आपलं घर मानतात आणि संस्थेला घरपण यावं म्हणून आपल्या नात्यागोत्यालाही संस्थेत सामावून घेतात. या जातीच्या लोकांना सग्या-सोयर्यांचा लई लळा!
खाण्या-पिण्याच्या बाबतीतही या जातीची खास वैशिष्ट्ये आहेत. निवडणूक काळात साधं खाणे आणि निवडणूक होताच कोंबड्या मटकाविणे हा यांचा आवडता प्रकार. पिण्यासाठी शक्यतो या जातीची मंडळी बाटलीचा वापर करतात. या जातीच्या लोकांना ‘बाटलीबॉय’ या टोपण नावानेही ओळखले जाते. या मंडळींचे खायचे आणि दाखवायचे असे दातांचे दोन प्रकार असतात. दाखवायच्या दाताने ते जेवण करतात तर खायच्या दाताने ते ऑनपासून तर लोनपर्यंत सगळं सगळं खातात! प्रत्यक्ष खाणे आणि अप्रत्यक्ष खाणे असा खाण्याचा दुर्मिळ प्रकार या जातीच्या लोकांमध्ये विशेषत्वाने दिसतो.
चिवटपणाबद्दलही या जातीचे खास कौतुक होत असते. एवढा चिवटपणा पृथ्वीतलावर सजीव प्राण्यात फक्त घोरपड या प्राण्यात, तर वनस्पतीमध्ये सागवान लाकडातच आढळून येतो. मनुष्य प्राण्यात मात्र या जातीच्या माणसा एवढा चिवटपणा दुसर्या कुणात शोधूनही सापडत नाही. चिवटपणाचा महिमा काय वर्णावा? एकदा ही जात एखाद्या संस्थेत घुसली की चिकटलीच समजा! ज्या संस्थेत ही जात घुसावी त्या संस्थेचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत चिवटपणा टिकून राहतो. संस्था ‘कोरडी’ पडल्यानंतर ही जात आपोआप निखळून पडते; गोचिडासारखी!
तथापि, उत्क्रांतीच्या प्रवाहात या जातीतही अनेक बदल झालेले दिसून येतात. पूर्वी ही जात ‘ म्हणजे ऊसाच्या जंगलात व दूधाच्या थारोळ्यात राहणारी म्हणूनच ओळखली जायची. आजकाल मात्र या जातीचे लोक वारंवार मुंबई सारख्या मोठ्या शहरातूनही चमकत आहेत. त्यामुळे काही काळानंतर ही जमात आयाराम गयाराम यादीत समाविष्ट करण्याबाबतही चर्चा घडून येत आहे.
भांडकुदळपणा करणे तर या जातीला अजिबात पटत नाही. तथापि, आपल्या ताकदीबद्दल उगीचच गैरसमज करु नये म्हणून भांडण्याचा देखावा उभारण्यात ही जात सराईत मानली जाते! निवडणूकीच्या पूर्वी भांडणे आणि निवडणूकीच्या आधल्या रात्री ‘कॉम्प्रमाईज’ करणे अशी समजुतदारवृत्तीही निसर्गत: या लोकांत असते. त्यामुळेच एरवी या जातीचे दोन नायक आपआपसात झुंजत असले तरी निवडणूकीत मात्र समजुतदारपणा दाखवून निवडणूक ‘बिनविरोध’ घडविणे या जातीला सहज शक्य होते.
ऊसाच्या भागात वाढ्यारे या जातीचे लोक शक्यतो ‘दुभत्या’ भागात डोकवित नाहीत. ज्यांना ….. सवय होते ते दूधाला तोंड लावीत नाहीत आणि जे दूधावर राहतात ते ऊसाला हुंगतही नाहीत. त्यामुळे ऊसावाला दूधवाल्यांच्या कासेला हात घालत नाही आणि दूधवाला ऊसाच्या वावरात शिरत नाही. प्रस्थापितांच्या जाती अंतर्गत ‘ऊसवाला’ आणि ‘दूधवाला’ अशा पोटजाती आढळल्या आहेत. पोटजात भिन्न असली तरी मुळ जात एकच असल्याने या दोन्ही जातीच्या लोकांत समजुतदारपणाचा गुणधर्म समान आहे. या समजुतदारपणाच्या गुण वैशिष्ट्यामुळेच ऊसावाला दूधात पाणी किती हे विचारीत नाही, तर दूधवाला ऊसात साखर किती अशा पंचायती करीत नाही.
या जातीचे लोक गृहप्रपंचाचा त्याग करीत असले तरी स्वत:च्या मुलांबद्दल यांना खूपच लळा दिसून येतो. आपल्या मुलांवर इतकं प्रेम करणारी जमात त्रैलोक्यात दुसरी कोणतीही नसेल. सहकार महर्षीच्या जातीचे लोक एकतर निवृत्त होत नाहीत. पण निवृत्तीची वेळ आलीच तर यांना मायेचा पान्हा फुटतो. गायीला वासराचा लळा असतो या जातीएवढी पुढारलेली अनुवंशिकता जगाच्या पाठीवर कुठेही आढळत नाही.
सत्तेवर असतानाच या जातीचे लोक आपल्या वारसाची अंडे उबवू लागतात. एरवी अन्य प्राण्यांत माद्यामध्ये अंडे उबविण्याचा गुण आढळतो, त्याला ही जात अपवाद ठरली आहे. वारसाच्या चोचीत सुरुवातीलाच एखाद्या बँकेचं संचालकपद, नाहीतर एखाद्या पंचायत समितीचं सभापतीपद किंवा जिल्हा परिषदेचं सदस्यत्व अशा पदांचे दाणे चोचीनं भरवून सत्ता खाण्याचं शिक्षण दिलं जातं. एकदा वारसाची पिल्लू अंड्याच्या बाहेर आलं की अंडे उबविणारा प्रस्थापित भुर्रकन उडून जातो आणि त्या जागेवर या जातीचा वारस अंडे उबवू लागतो…

– भास्कर खंडागळे,
बेलापूर (9890845551)

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here