ऑनलाइन शिक्षण की शिक्षा?

मागील काही काळात जगात परिवर्तन झाले निमित्त करोना वायरस. हया व्हायरसमुळे प्रत्येकाची जीवनशैली बदलली गेली. सर्वांचेच जीवनमान आव्हानात्मक झाले.
करोना ने प्रत्येक देशातील लोकांच्या केवळ स्वास्थ्यावर आघात केला नाही, तर देशाची अर्थव्यवस्था, आरोग्यव्यवस्था, समाजव्यवस्था, शिक्षण व्यवस्था इत्यादीना ही प्रभावित केले.
सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी ’लॉकडाऊन’ ची घोषणा केली आणि सर्वच घरात कैद झाले.दुकान, चित्रपटगृहे, मॉल, रस्ते ऑफिसेस, कंपन्या, शाळा सगळेच ओस पडले.’ मछली बिन तालाब’ अशी परिस्थिती निर्माण झाली.
लॉकडाऊन मुळे कोणीही घराच्या बाहेर न पडता घरूनच काम करण्याची संधी अनेक कंपन्यांनी दिल्यामुळे बराचसा कामगार वर्ग घरून काम करण्यात व्यस्त झाला. गृहिणी घर कामात व्यस्त झाल्या. पण, उपेक्षित राहिला तो आपला चिमुकला विद्यार्थी वर्ग.
सुरुवातीला परीक्षा रद्द झाल्या म्हणून कुठलाही अभ्यास नाही, शाळा नाही म्हणून आनंदी झालेली ही मुले सुट्टी असूनही खेळता, बागडता येत नाही म्हणून खट्टू झाली. मित्रांना भेटायचे सोडा पण घरातही नीटसे खेळता येईना की मामाच्या गावाला जाता येईना.
वेळ कोणासाठी थांबत नाही. जून महिना उजाडला शिक्षण थांबणे हे विद्यार्थ्यांच्या नव्हे तर देशासाठी ही नुकसानवह आहे. म्हणूनच, मुलांसाठी शाळा सुरू करण्याचे ठरले. पण, सोशल डिस्टंसिंग चा नियम आपण मोठे पाळू शकलो नाही तर मुलांकडून कुठली अपेक्षा ठेवणार म्हणून पुढे आला ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय आणि सुरू झाली पालकांची धावपळ त्यासाठी लागणारे लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाइल, इंटरनेट, वाय-फाय इत्यादिंची पाल्यासाठी पूर्तता करण्यात आली व ही सर्व शस्त्रे घेऊन आपले वीर मैदानात उतरली.
‘ब्लॅकबोर्ड’ पासून ’स्मार्टबोर्ड’ पर्यंतचा बदललेला प्रवास विद्यार्थ्यांनी सहजपणे आत्मसात केला. आळशी जीवनशैलीतून सुटका होऊन मुलांना परत एकदा शिस्त मिळाली. शैक्षणिक वर्ष वाया न जाता मोबाईलवर भाषा विषयाच्या धडयांबरोबर गणिताचे ही धडे गिरवू लागले. वर्गात सर्वांसमोर प्रश्न विचारताना वाटणारा संकोच नाहीसा झाला आणि तेच प्रश्न चाट बॉक्स वर विचारले जाऊ लागली. प्रत्यक्षात नाही पण स्क्रीनवर का होईना मित्र-मैत्रिणी दिसू लागली. पीटीचे सर स्क्रीनवरच कवायत घेऊ लागली. शिक्षक धडा अधिक कळावा यासाठी व्हिडिओ दाखवून मुलांना सूक्ष्म ज्ञान देऊ लागली.
पण, आपण विचार केलाय का ? मुलांना मोबाइल स्क्रीन पासून दूर ठेवू पाहणारे आपण आता, शाळा- क्लास आणि अभ्यासासाठी सतत त्यांना स्क्रीन समोर बसवू पाहतो. मोबाईल, इंटरनेट या सुविधा अवधानानेच मिळाल्याने मुले अभ्यासाच्या नावाखाली अजून कुठल्या सोशल साईट्सवर चाट करत बसतात याचा अंदाज पालकांनाही नसतो .एखादा गेमिंग किंवा फेक साईट ओपन करताना बँक डिटेल शेअर करून बसतात.
याव्यतिरिक्त मुलांना ऑनलाइन शिकवलेले कितपत कळाले याचा अंदाज शिक्षकांना येत नाही. मुले कित्येकदा व्हिडिओ ऑफ करून टाईमपासच करताना दिसून येतात. किंवा फेक आयडी घेऊन दुसर्‍याच्या नावाने चाट करून सगळा क्लास डिस्टर्ब करतात. शाळेत जी फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी होत असते ती ऑनलाईन मध्ये एका जागी तासंनतास बसून शक्य नाही.
ऑनलाईन शिक्षणाचा फायदयाबरोबर तोटे जरी असले तरी ती आजच्या काळाची गरज आहे. आज शाळा सुरू केल्या तरी किती पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायची तयारी ठेवतील हाही प्रश्न आहे?
शिक्षकांनी ज्ञान देताना ते अधिक रोचक आणि बांधून ठेवून शिकवणे, पालकांनी मुलांच्या हातातील स्मार्ट बोर्ड वर लक्ष ठेवणे त्याचा योग्य वापर शिकवणे हे पालक आणि शिक्षकांसाठी एक आव्हानच आहे.
तरी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या या रणांगणावर पालक पाल्याचे सारथी झाले तर आनलाईन शिक्षणाचे सार्थक होईल. अन्यथा ती शिक्षा ठरेल!
– सौ. शितल चित्ते मलठणकर
पुणे 9850888404

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here