Aurangabad : सुनेने हाकलून दिलेल्या वृद्ध दाम्पत्याला पोलिसांनी दिला आधार

गेल्या २० दिवसापासून कागजीपुर्‍यातील मंदिरात घेतला होता आश्रय

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
औरंगाबाद : आई-वडील समान असलेल्या वृद्ध दाम्पत्याचा छळ करून सुनेने त्यांना घरातून हाकलून दिले होते. सुनेने हाकलून दिलेल्या वृद्ध दाम्पत्याला पोलिसांनी आधार देत त्यांची परवानगी शिवाजीनगर येथील आस्था वृद्धाश्रमात केली. पोलिसांनी अजूनही खाकी वर्दीत माणूसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय आणून वृद्ध दाम्पत्याला हक्काचे घर मिळवून दिले.

मुळचे पैठण तालुक्यातील बालानगर येथील रहिवासी असलेले बाबासाहेब रावसाहेब पटवर्धन (वय ८८) हे तलाठी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी प्रभावती बाबासाहेब पटवर्धन (वय ८६) या गृहिणी आहेत. पटवर्धन दाम्पत्याला असलेल्या एकूलत्या एक मुलाचे त्यांनी मोठ्या थाटात लग्न लावून दिले होते. परंतु पटवर्धन यांच्या मुलाचे अचानकपणे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या सुनेलाच मुलगी मानले होते. मुलाच्या निधनाचे दुखः पचवून पटवर्धन दाम्पत्याने सुनेचे नात्यातील एका तरूणासोबत लग्न लावून दिले होते. तसेच आपले घर विकून ते सुनेसोबत राहत होते. १५ दिवसापूर्वी मुलगी मानलेल्या सुनेनेच पटवर्धन दाम्पत्याला घराबाहेर काढून दिले होते. त्यामुळे पटवर्धन दाम्पत्य कागजीपुरा येथील मारुतीच्या मंदिरात आश्रयाला होते. तसेच आजू-बाजूला भिक्षा मागून त्यावर आपला उदरनिर्वाह सुरू केला होता.

दरम्यान, एक दाम्पत्य कागजीपुरा येथे राहत असल्याची माहिती दौलताबाद पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांना मिळाली होती. आडे यांनी या दाम्पत्याला ताब्यात घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, दौलताबाद ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, जमादार अफसर शहा, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, रितेश जाधव, लखन गायकवाड, आयझेक कांबळे यांनी वृध्द दाम्पत्याला आधार देत त्यांना सामाजिक कार्यकर्त्या सुनीता तगारे यांच्या मदतीने शिवाजीनगरातील आस्था वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here