Karjat : शहरातील गाळेधारकांच्या प्रश्नावर सुवर्णमध्य काढू – खा सुजय विखे

प्रतिनिधी| राष्ट्रसह्याद्री ३१

कर्जत : कर्जत येथील मुख्य रस्त्याला असणाऱ्या गाळे धारकांसाठी मी आणि आमदार रोहित पवार एकत्र येऊन गाळे धारक आणि रस्ता यामध्ये सुवर्णमध्य असा मार्ग काढू. मात्र रस्ता करताना तो समान असायला हवा नाहीतर एकीकडे मोठा तर दुसरीकडे अरुंद असे नको. नाहीतर लोक आमची पंचायत करतील, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
ते रविवारी संध्याकाळी गाळेधारकांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत,जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ,अशोक खेडकर, दादासाहेब सोनमाळी, स्वप्नील देसाई, सचिन पोटरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अमित निमकर, मुख्याधिकारी गोविंद जाधव,गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे आदी उपस्थित होते.

कर्जत येथील मुख्य रस्त्यावरून अमरापूर-कर्जत-भिगवण हा राज्य मार्ग जाणार असल्याने कर्जत येथील मुख्य रस्त्यावरील गाळेधारकांचे गाळे विस्थापित होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गाळेधारकांशी चर्चा करण्यासाठी खा. विखे कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुढे बोलताना खा. विखे म्हणाले की, सर्व तालुक्यात रस्ता हा प्रश्न कमी अधिक प्रमाणात निर्माण होणार असल्याने आपण यापूर्वीच बायपास रस्त्यांचा आराखडा तयार करून या सर्व प्रश्नावर सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्याच्या आराखड्यात कर्जत शहरात जो रस्ता अरुंद आहे तो अरुंदच आहे. आणि मागे पुढे मोठा केला आहे. तो एकसारखा करावा. सर्वांना सुलभतेने जात येता यावे हा रस्त्याचा मूळ उद्देश साध्य झाला पाहिजे. कर्जत नगरपंचायतने आम्हाला इतक्या मोठ्या रस्त्याची गरज नाही असा ठराव मंजूर करून द्यावा. गोदड महाराज यांच्या रथोत्सवावेळी दुभाजक टिकणार नाहीत. त्यामुळे दुभाजक कमी करा किंवा स्ट्रीट लाईट मध्यभागी घ्यावा यावर पांढरा पट्टा मारावा. यासह गटारावर फुटपाथ घेता येईल का ते पहा अशा सूचना उपस्थित अधिकारी वर्गास केल्या. गावाचा विकासही झाला पाहिजे आणि गाळे वाचले पाहिजे यासाठी गाळे धारकांनी मानसिकता तयार केली पाहिजे. यासह काही शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे, असे खासदार विखे म्हणाले.
नगरपंचायत माझ्याच ताब्यात का ? खा विखेचा सवाल
गाळेधारक यांच्या बैठकीत कर्जत नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता असून त्यांनी कर्जत शहरात एवढ्या मोठ्या रस्त्याची आवश्यकता नाही असा ठराव घ्यावा. मग मी आणि आमदार अधिकाऱ्याशी बैठक घेऊन मार्ग काढू असे म्हणत असताना अचानक यु टर्न घेत उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्याकडे पाहत नगरपंचायत माझ्याच ताब्यात आहे ना ? असा सवाल उपस्थित केला. बैठकीत खा. विखेंनी राजकीय टोलेबाजी देखील केली.
आम्ही दोघे बाहेरचे – खा सुजय विखे
बैठकीत कर्जतच्या गाळेधारकांना न्याय मिळावा या मताशी आम्ही दोघे सहमतच आहोत. मात्र येथील अडी अडचणी आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. शेवटी आम्ही दोघे बाहेरचे आहोत, असे म्हणत रस्त्याचे ठेकेदार असणारे कोठारी यांच्या कामावर देखील खा. सुजय विखे यांनी प्रश्न उपस्थित केले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here