पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

0

मंदीर समितीचा निर्णय

आनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या पंढरपुरातील आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतल होती. ही मंदिरे लवकरच उघडण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलन केले होते. या आंदोलनापुरते पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी उघडण्यात आले होते. यानंतर आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. राज्य सरकारने आपल्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी सरकारने १० दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. १० दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मात्र, आज मंदिर समितीनेच 30 सप्टेंबरपर्यंत मंदिर न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रक काढून याची माहिती दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे खबरदारी च्या उपाययोजना म्हणून भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर 17/3/2020 ते 31/8/2020 पर्यंत बंदच ठेवण्यात आले होते. राज्य सरकारनेही जारी केलेल्या लॉकडाऊनच्या नोटिसीमध्ये राज्यातील मंदिरे 31 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार असल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे. या दरम्यानचे सणवार, उत्सव परंपरेनुसार साधेपणाने साजरे केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here