Editorial : ड्रॅगनची तिरकी चाल

राष्ट्र सह्याद्री 1 सप्टेंबर

एकीकडे वाटाघाटी करायच्या आणि दुसरीकडे मात्र युद्धाची तयारी करायची. दुस-याला गाफील ठेवून त्याची कोंडी करायची, हे युद्धात क्षम्य असले, तरी ही तिरकी चाल आहे आणि अशी तिरकी चाल करायची, वेळ का येते, हा स्वंतत्र अभ्यासाचा विषय आहे. कोणताही देश जेव्हा अंतर्गत प्रश्नांनी त्रस्त असतो. सत्ताधा-यांना हे प्रश्न सोडविण्यात यश येत नाही. नागरिकांचा रोष वाढत जातो, तेव्हा त्यावरचा जालीम उपाय हा भावनिक मुद्यांचा आधार असतो. त्यानेही भागले नाही, की मग इतरांवर हल्ले करण्याची योजना आखली जाते. शेजारच्या देशांशी कुरापती काढल्या जातात. पाकिस्तान हे त्याच्या जन्मापासून करीत आला आहे. आता चीनही त्याच वाटेवरून जात आहे.

गलवान खोरे व्यूहात्मकदृष्ट्या चीनच्या दृष्टीने फार महत्त्वाचे नाही, तरीही त्याने याच खो-याची निवड का केली, असा प्रश्न पाच मे पासून भारताचे लष्करी अधिकारी वारंवार उपस्थित करीत होते आणि चीनची तिरकी चाल ओळखून सर्व सैन्य एकाच भागात केंद्रीत करू नका, असा सल्ला देत होते. त्याचे कारण गलवान खो-यात भारतीय लष्कराला गुंतवून ठेवून पाकिस्तानच्या मदतीने अन्य भागांत कुरापती काढण्याचा चीनचा हेतू लष्करी अधिका-यांच्या लक्षात आला होता. त्यासाठी पाकिस्तानला पुढे करायचा, चीनचा कुटील डाव आहे. चीन आणि रशियासारख्या हुकूमशाही देशांत विरोधकांना फारसा आवाज नसतो, तसा तो काढला, तर त्याला चहा पाजून संपविण्याची किंवा गोळ्या घातल्या जातात.

चीनमध्येही तसेच केले जाते. त्यामुळे काहींनी चीन सोडून इतर देशांत आश्रय घेतला. त्यातील एकाने परवा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मते मागितली. चीनवर आक्रमक विस्तावादाचा आरोप केला. दुसरीकडे तैवानसारख्या देशाने चीनच्या बाजूने क्षेपणास्त्र डागले. चीनचे अध्यक्ष शी जिनिपंग यांनी गेल्या वर्षी स्वतःची तहहयात अध्यक्ष म्हणून निवड करून घेतल्यानंतरही त्यांच्या काही निर्णयावरून पक्षांतच आता मतभेद झाले आहेत. जिनपिंग यांच्यावर टीका करणारी शिया यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. जिनपिंग हे सर्वशक्तिशाली झाले आहेत. पक्षात आणि देशात त्यांना कोणीही विरोध करू शकत नाही. जिनपिंग यांनी संपूर्ण जगाला चीनचे शत्रू बनवले आहे. चीनमधील समस्यांपासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी जिनपिंग यांचे हे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदावर आजीवन राहण्यासाठी केलेली घटनादुरुस्ती चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोना संसर्गाच्या मुद्यावरही त्यांनी चीन सरकारवर टीका केली. वुहानपासून सुरू झालेला संसर्ग संपूर्ण जगभरात पसरला. चीन सरकारला कोरोना संसर्गाची माहिती सात जानेवारी रोजी समजली होती; मात्र २० जानेवारीपर्यंत त्यांनी ही माहिती लपवून ठेवली असल्याचा आरोप त्यांनी केला. हाच आरोप तर अमेरिकाही करीत होती. जगही त्याच भूमिकेत आहे.

आॅस्ट्रेलिया, ब्रिटन, चीन, जर्मनी, रशिया, अमेरिका आणि भारतही चीनच्या विरोधात गेला. आता श्रीलंका आणि नेपाळही चीनबरोबर राहिलेला नाही. विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न सर्वंच सत्ताधारी करीत असतात. आता चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने शिया यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काई शिया यांच्या वक्तव्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला असल्याचे पक्षाने म्हटले आहे. काई शिया यांनी गंभीर राजकीय समस्यांवर भाष्य केले असून त्यामुळे पक्षाच्या राजकीय शिस्तीचे उल्लंघन झाले असल्याचे पक्षाने म्हटले आहे. चीनमधील घडामोडींचे तज्ज्ञ अॅडम नी यांनी सांगितले, की कोरोना महासाथीने जिनपिंग यांच्या चीन कम्युनिस्ट पक्षातील वर्चस्वावर प्रश्न निर्माण केले आहे.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षात गटबाजी सुरू असून अनेक गटनिर्माण झाले आहेत. सध्याचा काळ चीनसाठी आव्हानात्मक असल्यामुळे हे गट एकत्र आहेत. जिनपिंग यांच्या कार्यपद्धतीवर याआधी अनेकदा टीका झाली आहे. जिनपिंग यांनी पक्षातंर्गत विरोधकांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यामुळे अनेकजण जिनपिंग यांच्याविरोधात उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर चीनने अंतर्गत प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हाँगकाँग, तिबेट, भारत, रशियाविरोधात कुरघोडीचे राजकारण सुरू केले आहे. काही महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यान सीमा प्रश्नी वाद सुरू आहेत. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याचा प्रयत्न सुरू असताना चीन सीमा भागात जोरदार हालचाली करत आहे. चीनने अरुणाचल आणि भूतान सीमेवरील तिबेटी नागरिकांना हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनला नेमके काय साध्य करायचे आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.

भारत आणि भूतान सीमेजवळ असणाऱ्या ९६ गावांतील लोकांना सीमेपासून दूर असणाऱ्या ठिकाणी चीन त्यांचे पुनर्वसन करत आहे. या ग्रामस्थांना नवीन घरे देण्यात आली असून यामध्ये वीज, पाणी आणि इंटरनेटसारख्या सुविधा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सीमेलगतच्या भागात चीनकडून जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे. भारत आणि भूतान सीमेजवळील तिबेटी लोकांना हटवण्याचे काम २०१८ पासूनच सुरू करण्यात आले होते. त्या वेळी ले गावातील २४ घरातील ७२ लोकांचे नवीन घरात स्थलांतर करण्यात आले होते. ही नवीन घरे जुन्या मूळ घरांपासून दूरवरच्या अंतरावर आहे. चीन ३० सप्टेंबरपर्यंत सर्वच ९६ गावांतील लोकांच्या पुनर्वसनाचे काम पूर्ण करणार आहे. त्यानंतर या ग्रामस्थांना या नव्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

अरुणाचल प्रदेशचा तवांग हा आपला भाग असल्याचा दावा चीन करतो. तवांग हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे चीन सांगतो. तवांग हा बौद्ध धर्मातील पवित्र स्थळापैकी एक आहे. १९६२ च्या युद्धात चिनी सैन्य तवांगपर्यंत पोहचले होते. भारतीय सीमा भागात चीनने आपले हवाई संरक्षण अधिक मजबूत केले आहे. एअर डिफेन्स सिस्टीम फक्त अपग्रेड केले नसून त्याचा आता विस्तारही करण्यात येत आहे. चीनने डोकलामजवळ सिक्कीमजवळील आपल्या भागात अर्ली वॉर्निंग रडार साइट्सजवळ क्षेपणास्त्र तैनात करत आहेत. नाकूला आणि डोकला जवळील ५० किलोमीटर दूर जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात करण्याची तयारी चीनने केली आहे. भारत त्यावर शांत नाही; परंतु आपल्याला अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.

भारताच्या सर्व सीमांवर चीनची जय्यत तयारी आहे. भारतानेही चीनही तिरकी चाल ओळखून अद्ययावत लष्करी सामुग्रीची जमवाजमव सुरू केली आहे. चीनने सीमांवर बाँबर विमाने तैनात केली आहेत. त्याला उत्तर म्हणून भारतानेही इस्त्राईलकडून अवॅक्स ही यंत्रणा आयात करण्याचे ठरविले आहे. राफेल ही लढाऊ विमाने लष्करात दाखल केली आहेत. दुसरीकडे भारतीय नौदलाने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. गलवान खो-यातील चकमकीनंतर नौदलाने आपली एक आघाडीवरील युद्धनौका ( फ्रंटलाइन वॉरशिप) दक्षिण चीन समुद्रात तैनात केली आहे. याच भागात चीन भारतीय नौदलाच्या जहाजांना विरोध करत आला आहे. याविरोधात वेळोवेळी चीनने तक्रारीही केल्या आहेत. भारतीय नौदलाच्या या जहाजाच्या तैनातीमुळे चीनमध्ये अस्वस्थता पसरली आहे. चीनने भारतासमोर हा मुद्दा उपस्थित केला असून त्यावर निषेधही व्यक्त केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत मुत्सद्दी संवादात चीनने हा मुद्दा भारतासमोर मांडला.

चीन सरकारसाठी दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. या भागात इतर कोणत्याही देशाची उपस्थिती चीनला पसंत नाही. चिनी नौदल ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चा विरोध डावलून भारताची युद्धनौका आपल्या अमेरिकेच्या समकक्षाच्या सतत संपर्कात आहे. अमेरिकेची जहाजेदेखील या भागात आहेत. भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका हिंदी महासागरात, विशेषतः मलाक्काच्या सामुद्रधुनीत तैनात केल्या आहेत. या प्रदेशातून चिनी जहाजे हिंद महासागरात प्रवेश करतात आणि इतर देशांमध्ये जातात. चिनी सैन्याची उपस्थिती पाहता भारतानेही आपले जवान तैनात केले आहेत. लडाखच्या संपूर्ण सीमावर्ती भागात भारताने आपली दक्षता वाढवली आहे. भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे आणि त्यास योग्य तो प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले आहे. गलवान खो-यातून पाच मे पूर्वीची परिस्थिती ठेवण्यास चीन तयार नसेल, तर लष्करी मार्ग हा उपाय असल्याचे सरसेनाध्यक्षांनी सांगितले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here