Shevgaon : शेतकरी व शेतमजूर यांना तातडीने दरमहा १० हजार रूपये पेन्शन सुरू करावी

शेतकरी व शेतमजूरांच्या मागण्यांसाठी किसानसभेचे देशव्यापी आंदोलन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनाच्या गेल्या पाच महिन्यात अन्यायकारक धोरणांमुळे शेतकरी व शेतमजूर पूर्णतः उध्वस्त झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजूर यांना तातडीने दरमहा १० हजार रूपये पेन्शन सुरू करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांनी केली.

अखिल भारतीय किसान सभा व शेतमजूर संघटनेच्या वतीने शेवगाव येथे बुधवारी (दि. २) तहसिल कार्यालयासमोर  शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर राज्य व देशव्यापी आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अॅड. लांडे यांच्यासह ज्येष्ठ नेते कृष्णनाथ पवार, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, संजय नांगरे, बापूराव लांडे, बाजार समितीचे संचालक अशोक नजन, भगवान गायकवाड, बाबा शेख, आत्माराम देवढे, कारभारी वीर आदींसह शेतक-यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

केंद्र व राज्य सरकार कोव्हिडच्या नावाखाली शेतकरी व शेतमजूर यांच्या विरोधात अन्यायकारक आदेश काढत असून ते तातडीने मागे घ्यावेत. अन्यथा तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा अॅड. लांडे यांनी यावेळी दिला. शेतकरी व शेतमजूर यांना तातडीने दरमहा १० हजार रूपये पेन्शन सुरू करावी, शेतक-यांच्या  शेतमालाला हमी भाव मिळावा, गायीच्या दुधाला ३५ रूपये लीटर व म्हशीच्या दुधाला ६० लीटर हमी भाव मिळावा, मनरेगा अंतर्गत २०० दिवसांचा रोजगार मजुरांना मिळावा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी, डिझेल-पेट्रोल दरवाढ त्वरीत मागे घ्यावी आदी विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसिलदार अर्चना पागिरे – भाकड यांना देण्यात आले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here