Aurangabad : भामट्याने घातला पोलिस उपनिरीक्षकालाच गंडा

कर्जाचे आमिष दाखवून गंडविले

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयातील बिनतारी संदेश विभागात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षकालाच भामट्यांनी ९० हजार २५० रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन भामट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्तालयातील बिनतारी संदेश विभागात प्रमोद विनायकराव तुळसकर (वय ५३) हे उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांना सप्टेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात शंकर नावाच्या भामट्याने संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना युन्हर ग्रीन फायनान्स कंपनीतून बोलत आहे, असे सांगत वीस लाखाचे गृहकर्ज मंजूर करुन खात्यावर जमा करण्याचे आमिष दाखवले. त्याला तुळसकर यांनी ब-याचदा कर्ज घेण्याबाबत नकार दिला.
परंतू भामट्याने त्यांना वेळोवेळी संपर्क साधत जाळ्यात ओढले. त्यानंतर हरिष आहुजा याने वेळोवेळी त्यांच्याकडून वेगवेगळे चार्जेस एक्सीस बँकेत भरायला भाग पाडले. अशा प्रकारे त्याने ९० हजार २५० रुपये तुळसकर यांच्याकडून उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तुळसकर यांनी सायबर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गिता बागवडे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here