Pathardi : ओव्हरफ्लोच्या पाण्याने साठवण बंधारे भरावेत : आमदार मोनिका राजळे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
पाथर्डी – मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्रात पाणी सोडण्याऐवजी ते कॅनॉलद्वारे सोडून कमी पाऊस झालेल्या दुष्काळी गावांचे साठवण बंधारे भरून देण्याची आग्रही मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे.
यंदा पाऊस समाधानकारक असला तरी झालेला पाऊस सर्वत्र सारखा नाही. काही गावांत अतिवृष्टी तर काही गावांत तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे तेथे भूगर्भातील पाणी पातळी वाढली नाही. साठवण बंधारे कोरडेच राहिले. सध्या तेथील खरिपाची पिके पाण्यावर आली आहेत. आज मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. अशा वेळी शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील मुळा कालव्याखालील साठवण बंधारे भरल्यास सोयीचे ठरणार असल्याने हे बंधारे कालव्याद्वारे भरून देण्यात यावेत अशी मागणी आ.मोनिका राजळे यांनी अधिक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण व कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर यांचेकडे केली आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तशात आवकही सुरूच असल्याने धरण व्यवस्थापनाने दोन हजार क्युसेक पाण्याचा नदी पात्रात विसर्ग सुरु केला आहे. वरुर, भगुर, अमरापुर, फलकेवाडी, चितळी, पाडळी, ढवळेवाडी, साकेगांव, सुसरे या शेवगाव – पाथर्डी तालुक्याच्या पट्यात पाऊस कमी झाला आहे . तेव्हा कालव्याद्वारे या गांवामधील बंधारे या ओव्हर फ्लोच्या पाण्याने भरायला हवेत.
याबाबत त्यांनी मुळा पाटबंधारे अहमदनगरच्या प्र. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याशी चर्चा केली असून लाभक्षेत्र विकास अहमदनगरचे अधिक्षक अभियंता अरुण नाईक व जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील व राज्य मंत्री बच्चू कडू यांना सविस्तर पत्राद्वारे बंधारे भरुन देण्याबाबतची मागणी केली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here