Shirurkasar : नगवण राजूरी-खरवंडी राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने करा, अन्यथा शेतक-यांचे आंदोलन – माजी मुख्य अभियंता डी जी मळेकर

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
बीड जिल्ह्यातील नवगण राजूरी ते नगर जिल्ह्यातील खरवंडी कासार या दरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१(एफ) ची भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे. याचा परिणाम महामार्गाच्या कामावर होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया गतीने व्हावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता तथा आर्वी येथील रहिवासी डिगांबर मळेकर यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बीड व नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ (एफ)मंजूर होऊन व काम सुरु होऊन दोन वर्षे होत आली आहेत. या महामार्गावर बीड जिल्ह्यातील श्रीपतवाडी, ब्रम्हनाथ येळंब, आर्वी, जांब, खालापूरी, औरंगपूर, काटवटवाडी आणि नवगण राजूरी अशी आठ गावे येतात. महामार्गाच्या कामासाठी या गावांच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी (ल.पा.) आणि उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेले आहे. मात्र, भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीत नाही.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३ (अ) प्रसिद्ध केले असून यावरील हरकतींचीही पाच महिन्यांचा कालावधी होऊनही अद्याप सुनावणी झालेली नाही. संपादित होणाऱ्या मालमत्तेचे मुल्यांकनही झालेले नाही. त्यामुळे ३ (ड) अधिसूचना प्रसिद्ध करता आलेली नाही. कंत्राटदाराचा कामाचा कालावधी संपत आलेला असताना काम अर्धवट अवस्थेत आहे. पुलांची कामेही रखडली असून ३ (अ) लॅप होण्याचा धाेका असल्याने अधिसूचना ३ (ड) लवकर प्रकाशीत होणे आवश्यक आहे. यासाठी भूसंपादन प्रक्रिया गतीने होणे गरजेचे असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली गेली आहे. निवेदनावर डिगांबर मळेकर यांच्यासह गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तर आंदोलन करु
बीड व नगर जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग ठरणार आहे. आठ गावे महामार्गावर येणार आहेत. काम गतीने होण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकर व्हावी, शेतकऱ्यांना मावेजा लवकर मिळावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात येईल.
– डिगांबर मळेकर, ग्रामस्थ आर्वी तथा माजी मुख्य अभियंता

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here