Aurangabad : बेवारस अवस्थेत सापडलेले साडेतीन लाखांचे दागिने त्यांनी केले परत

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अपार्टमेंटच्या आवारामध्ये बेवारस अवस्थेत सापडलेले तब्बल तीन लाख ४७ हजार रूपये किंमतीचे दागिने दाम्पत्याने पोलिसांकरवी मूळ मालकाला परत दिले. हरवलेले दागिने परत मिळाल्याचे पाहून मूळ मालकाला दागिने परत देणार्‍या दाम्पत्याचे आभार मानताना शब्द अपुरे पडत होते.

मिलिंद वसंतराव नाईक (रा.सनराईज पार्क, न्यु हायस्कूल, हर्सूल) यांना सनराईज पार्क अपार्टमेंन्टच्या आवारात १६ ऑगस्ट रोजी जवळपास साडेतीन लाख रूपये किंमतीचे सोन्याचा नेकलेस, एक राणी हार, एक सोन्याची नथ, कानातील चैन, सोन्याची आयरींग सापडली होती. मिलिंद नाईक व त्यांची पत्नी मानसी नाईक यांनी सापडलेले दागिने हर्सूल पोलिस ठाण्यात रितसर जमा केले होते.

दरम्यान, रूख्मण उर्फ योगिता प्रकाश पठाडे (वय ३५, रा.शिवदत्तनगर, हर्सूल, पिसादेवी रोड) या हर्सूल पोलिस ठाण्यात आपले दागिने हरविल्याची तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना दागिन्याच्या पावत्या तसेच दागिन्यासह काढलेले फोटो आणण्यासाठी सांगितले. रूख्मण उर्फ योगीता पठाडे यांनी पावत्या व फोटो आणून दाखविल्यानंतर नाईक दाम्पत्याला सापडलेले दागिने पठाडे यांचे असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी आदेश दिल्यानंतर हर्सूल पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांच्या उपस्थितीत पठाडे दाम्पत्याला नाईक दाम्पत्याच्या हस्ते दागिने परत देण्यात आले. तसेच पोलिसांनी नाईक यांनी दाम्पत्याचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here