Shrirampur : माळवाडगांव परिसरात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | संदिप आसने

एकीकडे शेतकरी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह पावसाने आपला कहर सुरु केला आहे. काल (दि.३) रोजी रात्री ८ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना आता अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील माळवाडगांव, मुठेवाडगाव, खानापुर, भामाठान, भोकर, टाकळीभान, कमालपुर, वांगी, खिर्डी व कारेगाव या भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच कोरोनामुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्याला ऐन पीकं काढणीच्या काळात वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं आहे. यामुळे उस व मका यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यामुळे उस व चारापिके भुईसपाट झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी उस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र, काल झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे उस व चारापिके भुईसपाट झाली आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. या वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here