Rahuri : तपासणीसाठी कोरोना किटच मिळेना

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शासनाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये कोरोनाची तपासणी थंडावली आहे. मागील तीन दिवसापासून रोज तीस किट उपलब्ध होत असल्याने, गरजूंना नगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी जावे लागत आहे. कोरोना तपासणी होत नसल्याने, गरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड सुरू झाली आहे.

राहुरी कृषी विद्यापीठ येथील कोवीड केअर सेंटरमध्ये रोज दीडशे ते दोनशे जणांच्या रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या केल्या जात होत्या. ॲन्टीजेन चाचण्यांच्या किट संपल्याने, आठ दिवसांपासून घशातील स्वॅब घेऊन, तपासणी केली जात होती. परंतु, मागील तीन दिवसांपासून रोज फक्त तीस जणांची स्वॅब तपासणी केली जात आहे.

खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले पंधरा ते वीस जण रोज तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीसाठी पुन्हा खासगी प्रयोगशाळेत मोठा खर्च करावा लागत आहे.

विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण खासगी दवाखान्यात जातात. त्यांना थंडी, ताप, खोकला असल्यास खाजगी वैद्यकीय व्यावसायिक कोरोनाची तपासणी करण्यास सांगत आहेत. त्यामुळे कोरोना तपासणी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाची मोफत तपासणी सेवा थंडावल्याने, रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे.

कोरोना तपासणी वाढविण्यासाठी रोज शंभर किटची मागणी केली आहे. ॲन्टीजेन चाचण्यांच्या किट संपल्या आहेत. नगर येथे जिल्हा रुग्णालयात कोरोना किटचा तुटवडा आहे.

– डॉ. नलिनी विखे, तालुका आरोग्य अधिकारी, राहुरी.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here