Aurangabad : कारच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार; चिमुकल्यांचा जीव बचावला 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नगरनाका येथे भीषण अपघात

नगरनाका रोडवर पाठीमागून भरधाव आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात वकील पती सह-पत्नी जागीच ठार झाली. तर चिमुकला गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात गुरूवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमूकल्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती छावणी पोलिसांनी दिली.

औरंगाबाद खंडपीठात वकिल असलेले अमोल रामधन हेरोळे (वय ३५), त्यांच्या पत्नी प्रियंका (वय २६, दोघेही रा.वडगाव कोल्हाटी) आणि मुलगा उत्कर्ष (वय २), असे तिघेही गुरुवारी सायंकाळी नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. रात्री पावणे अकराच्या सुमारास तिघेही दुचाकीने (एमएच-२०-एडब्ल्यू-९८१३) वडगाव कोल्हाटी कडे जात होते.

नगरनाक्यावरील केंद्रीय विद्यालयाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या कार (एमएच-२०-एएस-५४४४) चालकाने त्यांना धडक दिली. दुचाकी धडक बसताच कारची समोरची दोन्ही चाके निखळली. तसेच दुचाकीवरुन फेकल्या गेल्यानंतर अमोल आणि प्रियंका यांना दुरवर फरफटत नेले. तर उत्कर्ष रस्त्याच्या बाजूला पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

हा अपघात घडताच कार चालकाने धूम ठोकली. अपघाताची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा मृतदेह घाटीत उत्तरीय तपासणीसाठी नेला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सचिन वायाळ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here