क्वारन्टाईन पती

0

(शितल चित्ते मलठणकर, पुणे 9850888404)

“कोविड 19” किंवा कोरोना हा शब्द आज सगळ्यांच्या परिचयाचा झाला. त्यासाठी घ्यावयाची काळजी, न करावयाच्या गोष्टी लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सर्वांना इथंभूत माहिती झाल्यात. कोणालाही नको असलेल्या हया अज्ञात पाहुण्याने जेव्हा माझ्या दारावरची बेल वाजवली तेव्हा मात्र आमच्या काळजाचा ठोका चुकला. अवचित सुरु झाली “करोना विरुद्धची” लढाई. सर्व प्रकारची काळजी घेऊनही माझ्या पतीला अगोदर कणकण जाणवून ताप आला. डॉक्टरांकडून टेस्ट करून घ्यायचा सल्ला मिळाला. सुरुवातीला टाळत असलेली टेस्ट आम्ही करून घ्यायचे ठरवले. रिपोर्ट येईपर्यंतचे दिवस काळजीत व तणावात घालवले. सकाळी उठल्या उठल्या रिपोर्टचा मेल ओपन करे पर्यंत देवाचे नाव घेऊनही यायचा तो रिपोर्ट आला आणि ब्रह्मांड आठवले. डोक्यात नाना तऱ्हेचे विचार येऊ लागले की पुढे आता काय?

पण, मनाला धीर देऊन अचानक आलेल्या या संकटाला खंबीरपणे तोंड देऊन परतवून लावण्याचे ठरवले. सावित्रीचे कर्तव्य करत त्यांच्या पाठीशी उभे राहिले. देवकृपेने पतीला फार काही त्रास होत नसल्याने ती खूप मोठी जमेची बाजू होती. त्यामुळे डॉक्टरांनी होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला आणि “पती क्वारंटाईन” झाले.

सगळी काळजी घेऊन मी जमेल तेवढी त्यांची ‘नर्स’ नव्हे तर ‘आई’ होऊन सेवा करण्याचा प्रयत्न केला. पण, माझी होणारी धावपळ आणि तगमग बघून त्यांना स्वतःला होणाऱ्या त्रासा पेक्षा माझी जास्त काळजी वाटत राहिली. सुदैवाने आता काही दिवसात यातून पूर्ण बरे होऊन आम्ही ह्या दिव्यातून बाहेर पडू. पण, हा सर्व उहापोह यासाठी कथन केला की, कोविडबद्दल आमच्याच नव्हे, तर आपल्या सर्वांच्या अनेक गैरसमजुती आहेत ते अनुभव मांडत आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळी ट्रीटमेंट चालू ठेवा, गोळ्या-औषधे वेळच्या वेळी घ्या आणि ऑक्सिजनची पातळी तपासत रहा. या गोष्टी तर ओघाने सर्व करतात. पण, समाजाला,आप्तेष्ठांना अथवा आपण राहत असलेल्या परिसरात आपण पॉझिटिव्ह झाले आहोत, हे सांगायला लोक घाबरतात. कारण, समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल असा अनेकांना प्रश्न पडतो. बरेच जण ही गोष्ट लपवून ठेवतात.

सुदैवाने आम्ही ज्या सोसायटीत राहतो. त्या सर्वांना आम्ही कळवले तेव्हा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी सर्वांचे फोन आले. काळजी करू नका, कधीही काही लागले तर नक्की कळवा. ही आमच्या बद्दलची आपुलकी बघून आम्हाला सुखद धक्का मिळाला आणि सोसायटीत आमच्यावरील सर्वांचे प्रेम हि कळाले. त्यांच्या प्रत्येक फोन मधून आम्हाला धीर मिळत गेला आणि आपण एकटे नाही याची जाणीव झाली.

माझे समाजातील प्रत्येकाला हेच मागणे आहे की, आपल्या ओळखीतील पॉझिटिव्ह पेशंटला तुमच्या एक फोन करून विचारपूस करण्याने निम्मे बरे वाटणार असेल आणि दिलासा मिळणार असेल तर काय हरकत आहे? आता समाजाने कोविड पेशंट कडे अस्पृश्य नजरेने बघायचा दृष्टिकोन बदलायला हवा. सर्वांनीच एकजुटीने याचा सामना करावयाचा आहे. शक्य तेवढी मदत करुन समाजाचे ऋण फेडायची हीच ती वेळ.

टीव्हीवर नुकत्याच बघण्यात आलेल्या एका जाहिरातीत दाखवले आहे की, आपल्या घराजवळ एक करोना पेशंट आलाय आणि आता आपण घराची सर्व दारे खिडक्या बंद करून घेऊयात. त्यात एक खूप मार्मिक वाक्य सांगितलेले आहे की, “त्याला एकटे राहायला सांगितले…..एकटे पाडायला नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here