रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पुण्यात आता 1 हजारांचा दंड

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
पुणे ः पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असतानाही नागरिकांमध्ये अद्यापही गांभीर्य दिसत नाही. रस्त्यावर गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणार्‍यांचे प्रमाणही वाढतच आहे. त्यामुळे पालिकेने आता या थुंकणार्‍यांविरुद्ध आणखी कडक मोहिम करण्याचा निर्णय घेतला आहे. थुंकणार्‍यांना आता थेट एक हजारांचा दंड केला जाणार आहे. यापूर्वी 100 रुपयांचा दंड आकारला जात होता.
पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता करणे, घाण करणे अशा कृतीसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. दंडात्मक कारवाई करुनही नागरिक रस्त्यावर थुंकणे बंद करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारीही केल्या जात आहेत. त्यामुळे दंडाची रक्कम आता एक हजार रुपये करण्यात आली आहे. तसे पत्र विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेला पाठविले होते. पालिका आयुक्तांकडून याबाबतचे आदेश शहरासाठी लागू करण्यात आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास यापूर्वी 100 रुपयांचा दंड आकारला जात होता. यापुढे आता 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयांच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांना दंड आकारणीचे व पुढील कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. यासोबतच पालिकेचे सर्व उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रमुख उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरिक्षक, परवाना निरीक्षक, मैंटेनेन्स सर्व्हेअर व कार्यालयीन अधिक्षक यांना या शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये व खाजगी कार्यालयांमध्ये कोणतीही व्यक्ती मास्क परिधान न करता संचार करताना आढळल्यास दंड आकारण्याच्या कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. ही कारवाई अधिक प्रभावी व परिणामकारक होण्याच्या दृष्टीने सर्व पोलिसांनाही हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here