Editorial : बारभाई कारस्थान!

राष्ट्र सह्याद्री 6 सप्टेंबर

भारतीय जनता पक्ष हा कायम इतरांपेक्षा वेगळा पक्ष असल्याचा दावा करीत असतो; परंतु भारतीय जनता पक्षाची वेगाने काँग्रेस होत आहे, याचा प्रत्यय वारंवार येतो आहे. सत्ता नेत्यांना एकत्र बांधून ठेवते. सत्ता गेली, की आरोप-प्रत्यारोप व्हायला लागतात. ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या पक्षाची अवस्था ‘पार्टी वुईथ डिफरन्सेस’ कधी झाली, हे त्यांनाच कळले नाही. सत्तेतील स्पर्धकांचे खच्चीकरण करायचे, ही काँग्रेसमध्ये जी पद्धत होती, ती भाजपतही रुळली. चारित्र्य, निष्ठेपेक्षा पैसा, सत्तेला जास्त महत्त्व आले. भारतीय जनता पक्ष हा मूठभरांचा पक्ष होता. ठराविक समाज समूहाचा असलेला हा पक्ष एकाएकी सर्व समाजघटकांत पोचलेला नाही. त्यासाठी अनेक नेत्या, कार्यकर्त्यांनी परिश्रम केले. राज्य पिंजून काढले. सत्ता नसतानाही त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्लया. सत्ता आल्यानंतर निष्ठावंतांना न्याय मिळाला का, हा संशोधनाचा भाग आहे.

काँग्रेसमध्ये जसे समाजात स्थान असलेल्या नेत्यांना दूर ठेवून दरबारी राजकारण करणा-यांची चलती झाली, तेच भाजपतही सुरू झाले. सत्ता येते. जाते. त्यातून आत्मचिंतन करून कुठे चुकले, याचा अभ्यास केला, तर चुका दुरूस्त केल्या, तर पक्ष मोठा होत जातो; परंतु सत्ता जाऊनही गटबाजी कमी झालेली नाही. एखाद दुस-या पराभवाने नेते तसेच पक्ष संपत नसतो. भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना मात्र त्याची जाणीव नाही. पक्षांतील अंतर्गत गटबाजी, डावललेपणाची भावना दूर करण्याऐवजी शत्रुत्त्वाची भावना बळकट होताना दिसते आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, मीच मुख्यमंत्री अशा भावनेने वावरणा-या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी लीलया दूर केले. त्यातील काहींना विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारी नाकारण्यात आली, तर काहींना पराभूत व्हावे लागले. त्यालाही पक्षांतर्गत गटबाजी कारणीभूत आहे.

पक्षाच्या संघटनात्मक पदापासूनही ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मात्र जाणीवपूर्वक संधी देण्यात आली. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांची तोंडं गप्प राहतील, असा पक्षाच्या नेत्यांचा जो समज होता, तो दूर व्हायला एकनाथ खडसे डागत असलेल्या तोफांवरून हरकत नाही. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एक डझनाहून अधिक मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप होते. त्यातील खडसे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. इतर मंत्र्यांना मात्र क्लीन चीट देण्यात आली. लोकायुक्तांनी ठेवलेल्या ठपक्यामुळे प्रकाश मेहता यांना गृहनिर्माण मंत्रिपद सरकार जाता जाता सोडावे लागले. विरोधी पक्षात असताना ज्या खात्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोपांचा भडीमार केला होता, त्याच खात्याचे मंत्रिपद त्यांना भाजप प्रवेशानंतर देण्यात आले, हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल.

खडसे यांनी विरोधी पक्षनेते असताना काँग्रेसमधील अनेक गैरप्रकारांवर तोफ डागली होती. त्याच खडसे यांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्या तोफा स्वकीयांच्या दिशेने वळविल्या आहेत. त्यातही त्यांच्या तोफेचे लक्ष्य फडणवीस हेच आहेत. रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव हा पक्षांतर्गत राजकारणातून झाला, असे आरोप त्यांचे समर्थक करीत होते. खडसे यांना त्याचे शल्य आहे. खडसे आरोपामागून आरोप करीत असताना फडणवीस मात्र कोणतेही उत्तर देत नाहीत. चंद्रकांतदादा पाटील यांनी खडसे यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर खडसे यांनी त्यांची अशी काही पिसे काढली, की त्यानंतर चंद्रकांतदादांनाही गप्प बसावे लागले. पक्षावर टीका करणा-या प्रा. राम शिंदे यांचे पुनर्वसन केले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाविरोधात जाऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गरळ ओकणा-यांना पावन करून घेऊन त्यांना विधान परिषदेत संधी आणि पक्षप्रवक्तेपद दिले जाते आणि पक्षासाठी काही दशके काम करणा-यांना मात्र सत्तेसाठी दूर ठेवले जाते, याचा राग केवळ मुंडे-खडसे यांनाच नाही, तर अनेकांना आहे. ते बोलत नाही, इतकेच. खदखद मात्र कायम आहे.

भाजप स्वबळावर लढला, त्यापेक्षा कमी जागा अन् य पक्षीय नेत्यांना बरोबर घेतल्यानंतर मिळाल्या. मित्रपक्ष दूर गेला. सत्ता गेली, त्यामुळे फडणवीस यांच्यावर पक्षातूनच टीका व्हायला लागली. विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस राज्य सरकारवर तुटून पडले असताना त्यांच्या नेमकी विरोधी भूमिका पक्षातूनच घेतली जात असल्याने त्यांचे लढण्याचे बळही कमी होत आहे. अर्थात त्याला त्यांचेच राजकारण जबाबदार आहे.

पंकजा यांचे केंद्रात पुनर्वसन करण्याचे चंद्रकांतदादांनी सांगितले होते; परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. पक्षात असंतोष वाढत चालला आहे आणि असंतुष्टांचा राग शांत करण्यासाठी पक्षातून कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे आता आता खडसे यांच्या आरोपाने केवळ मनोरंजन होत नाही, तर भाजपच्या अंतर्गत गटबाजीची लक्तरे दररोज टांगली जात आहेत आणि पक्षावर मनापासून काम करणा-या कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. आता तर खडसे यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे पक्षातील अस्वस्थता किती खोलवर रुजली आहे, याची प्रचिती यायला काहीच हरकत नाही. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळे याला त्याच वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी भेट दिली, असा गंभीर सवाल खडसे यांनी केला.

खडसे यांची तोफ सुरू झाली, की ती लवकर थांबत नाही. गेल्या तीन दिवसांपासून ते सातत्याने फडणवीस यांच्यावर थेट नाव घेऊन टीका करीत आहेत; परंतु त्यांच्या टीकेवर कुणीही बोलायला तयार नाही. बरे खडसे यांनी आताच टीका केली असे नाही, तर विधानसभेत असतानाही त्यांनी अशाच स्वरुपाची टीका थेट सभागृहात केली होती. पक्षांतर्गत कारवाई करण्याचे धाडसही प्रदेश भाजप दाखवित नाही. फडणवीस आणि चंद्रकांतदादा वारंवार आम्ही खडसे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होतो; परंतु दिल्लीवरून उमेदवारीत बदल केला असे सांगण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नाही. मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, अशा शब्दांत खडसे यांनी फडणवीसांवर हल्ला चढविला.

आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले. पेशवाईत जसे बारभाई कारस्थान चालायचे, तसेच फडणवीस करीत होते, असे त्यांना म्हणायचे आहे. विधानसभेच्या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला घेरण्याची तयारी भाजपने केली असताना त्यांचा आवाज नैतिकदृष्ट्या कमी करून सत्ताधा-यांना अप्रत्यक्ष मदत करण्याचे काम खडसे करीत आहेत. फडणवीस तसेच भाजप सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांबाबत खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला आहे. २००९ ते २०१४ या काळात राज्यात भाजपचे सरकार यावे, यासाठी माझ्यासह गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गिरीश बापट, विनोद तावडे यांनी जिद्दीने सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळे भाजपचे स्वबळावर सरकार आले.

साधारण अपेक्षा अशी असते, की जो विरोधीपक्ष नेता असतो तोच मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपद न मिळता फडणवीसांना मिळाले. नंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचले गेले. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय काळात एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता’, असा दावा खडसे यांनी केला. माझे दाऊदच्या बायकोबरोबर बोलणे होत असल्याचा आरोप हॅकर मनीष भंगाळे याने केला. देशभर हे प्रकरण गाजत असताना त्याच दिवशी हा मनीष मध्यरात्री दीड वाजता फडणवीस यांना भेटला. त्याच्यासोबत कृपाशंकरसिंह देखील होते. त्याचवेळी त्यांच्या भेटीचे फोटोग्राफ माझ्याकडे आले होते. भंगाळे याला भेटण्याचे कारण काय, असा सवाल खडसे यांनी केला आहे.

तेथून मनात शंका आली. त्यानतंर पुन्हा माझ्या जावयाने लिमोझिन घेतली, मी एआयडीसीची जमीन विकत घेतली, असे आरोप करण्यात आले. जमीन खरेदीची झोटिंग समितीकडून चौकशी करण्यात आली. त्या अहवालातदेखील काही तथ्य नव्हते, असे नमूद करत खडसे यांनी फडणवीसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मी काय गुन्हा केला की तुम्ही मला राजीनामा देण्यास भाग पाडले? माझ्या मुलीला तिकीट देवून तिची हरविण्याची व्यवस्था केली. आमच्याच पक्षातील काही लोकांना सांगून विरोधात प्रचार करायला लावला त्याचे पुरावे देखील चंद्रकांत पाटील व फडणवीसांना मी दिले, त्यांनी कारवाई करतो सांगितले. सहा महीने झाले तरी कोणतीही कारवाई केली नाही. या सर्व प्रकाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, या सत्य व पुराव्याच्या आधारे मी एक पुस्तक लिहिणार आहे. त्याचे नाव ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ असे असणार असल्याचेही खडसे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here