Shrigonda : शेडगाव येथील विनापरवाना खते व किटकनाशक साठा जप्त; संबंधित विक्रेत्यावर गुन्हा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
तालुक्यातील शेडगाव येथे विनापरवाना खते साठवणूक करणे व विक्री करणे या विरोधात सिद्धीविनायक कृषी सेवा केंद्राचे चालक विजय रघुनाथ पवार, रा. जलालपूर ता. कर्जत यांच्या विरोधात कृषी विभागाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खत नियंत्रण कायदा, किटकनाशक कायदा व अत्यावश्यक वस्तू कायदा अतंर्गत तरतुदीचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित कृषी सेवा केंद्र हे कोणत्याही परवान्या शिवाय कार्यरत होते. सदरील कृषी सेवा केंद्राची तपासणी, पंचनामा सील करण्याची कारवाई पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी व डॉ. राम जगताप यांच्यासह, अमजद ताम्बोळी, किसन सांगळे व संदीप बोदगे यांच्या भरारी पथकाने केली. कारवाई दरम्यान रु. ३.२९ लक्ष रक्कमेची खते तर रु. १.२६ लक्ष रक्कमेची किटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.
याबाबतीत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे संबधीत विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या पुढील प्रवास सहा. पोलीस निरीक्षक सतीश गावित हे करत आहेत.
खत, बियाणे व किटकनाशके विक्रेत्यांनी या कायद्याचे सक्तीने पालन करावे, कायद्याचे उल्लंघन केल्यास कृषी विभागाकडून फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here