Aurangabad : बीएसएनएलच्या उपमंडळ अधिकारी महिलेला खंडणीची मागणी

दोन अट्टल गुन्हेगारांना अटक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
बीएसएनएलच्या उपमंडळ अधिकारी महिलेकडे पन्नास लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सात ते आठ जणांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात ३ ऑगस्ट गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना खंडणी प्रकरणात अटक केली आहे. दरम्यान, ५ सप्टेंबरला त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. त्यांनी खंडणीच्या गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे.

जालन्याच्या बीएसएनएल कार्यालयात उपमंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता बाबासाहेब नरवडे (४२, रा. नंदनवन कॉलनी) या ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कार्यालयातील महिला भावसार आणि अधिकारी प्रसाद देशपांडे यांच्यासह कारने (एमएच-२०-ईजे-०७५७) औरंगाबादकडे येत होत्या. त्यावेळी त्यांच्या कारला सेव्हन हिल उड्डापुलाजवळ दुचाकीवर आलेल्या सहा ते सात जणांनी अडवले होते. यावेळी त्यांनी शिवीगाळ करुन प्रशांत चंद्रमोरे व अ‍ॅड. नयुम शेख यांची माणसं आहोत. तुमच्याकडे पन्नास लाख रुपये शिल्लक आहेत, असे म्हणत खंडणीची मागणी केली होती. तसेच कारच्या काचेतून हात घालत त्यांनी नरवडे यांचा गळा धरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, नरवडे यांच्यापर्यंत हात न पोहोचल्याने टोळक्याने कारवर समोरुन दगड फेकत काच फोडली होती. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी पुंडलिकनगर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणात फिरोज खान जोहर खान (२३, रा. हुसेन कॉलनी) आणि फय्याज बशीर पठाण (३०, रा. बायजीपुरा) यांना अटक केली आहे. त्यांनी नरवडे यांना खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे. त्यावरुन त्यांना दुस-या गुन्ह्यात देखील अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, रावसाहेब मुळे, जमादार रमेश सांगळे, पोलिस नाईक बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, दीपक जाधव, कल्याण निकम, विलास डोईफोडे, जालींदर मान्टे व आशिष राठोड यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here