shrigonda : माजी मंत्र्याच्या गावातील जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी तरुणांचे उपोषण

अन्य महत्वाच्या मागण्यांसाठीही निवेदन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्याची आर्थिक तसेच राजकीय राजधानी व माजी मंत्र्याच्या काष्टी गावातील जिल्हा परिषद शाळेसह विविध महत्वपूर्ण मागण्यांसाठी तरुणांनी उपोषण करण्याचे निवेदन जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी यांनाही दिले आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की गेल्या 6 वर्षपासून काष्टीतील तरुण विक्रम पाचपुते,आणि सचिन पाचपुते जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करत आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्ष करणाऱ्या सवयीमुळे आज या तरुणांनी उपोषण करण्याची तयारी जिल्हा परिषद समोर केली आहे.
राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या काष्ठी गावातील नागरिकाकडून वारंवार जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंडवर चारही बाजूने अतिक्रमणे होत आहेत, जिल्हा परिषदेचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत. परिणामी अनेक कामे चुकीच्या पद्धतीने चालू आहेत. त्या चुकीच्या कामात अनेकवेळा पाठपुरावा करून सुद्धा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंडवर ग्रामपंचायतचे मोठ्या प्रमाणात आधीच अतिक्रमण आहे. त्याच ग्राउंडवर गावच्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत. त्या पाण्याच्या टाकीचा विषय न्यायालयात सुरू असून आता जिल्हा परिषदेने सरकारी दवाखाना शाळेच्या ग्राउंडवर घेतल्यामुळे काष्टीतील तरुणांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे.
गावातील तरुणांना, वयोवृद्ध नागरिकांना पहाटेच्या वेळी, सायंकाळच्या वेळी फिरण्यासाठी याच मैदानात यावे लागते, गावची यात्राही याच मैदानात भरते, गावातील अनेक मुले मैदानी खेळ याच ग्राउंडवर खेळतात, अशातच गावची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे, आणि अशाप्रकारची अतिक्रमणे वाढत गेली तर भविष्यात मुलांना, गावाला असे ग्राउंड उपलब्ध करून देता येणार नाही. पण दिवसेंदिवस स्थानिक नेते शाळेच्या ग्राउंडचा विषय प्रतिष्ठेचा करत असल्याने जिल्हा परिषद शाळा मोडकळीत काढण्याचा हेतू दिसत आहे.

ही शाळा जर मोडकळीत निघाली तर गोरगरीब विद्यार्थ्यांना महागड्या खाजगी शाळेत शिक्षण घेण शक्य नाही आणि ही येणारी पिढी सुरुवातीपासून सुरुवात होण्यापूर्वी मोडकळीत निघण्यास सुरुवात होत आहे, आणि 3 वर्षापूर्वी दवाखान्याची जागा स्थलांतरित करावी यासाठी निवेदन जिल्हा परिषदला दिलेले आहे, ग्रामपंचायत कार्यालय हे तळमजल्यावर घेण्यात यावे, असा ठराव ग्रामपंचायत सदस्यांनी मांडून मावळत्या सरपंचांनी अनुमोदन देऊन ठराव मंजूर केला आहे. ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केली होती त्यांनी ही तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश देऊनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे.

काष्टीचा बैल बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याचा कर गोळा करण्याचा ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, असा आदेश 2 वर्षापूर्वी मंत्रालयातून आलेला तरीही जिल्हापरिषद कार्यवाही करत नाही त्यावर ही कारवाई व्हावी. उच्च न्यायालयाने 32 गाळ्यांचे फेर निलाव करण्याचे आदेश 5 वर्षांपूर्वी दिलेले आहेत. तरीही अजून जिल्हापरिषद कार्यवाही करत आहे, याव्यतिरिक्त अनेक प्रश्न घेऊन येत्या 21 तारखेला सकाळी 11 वाजता जिल्हापरिषद समोर उपोषण करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी आणि श्रीगोंदा तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनाही निवेदनाच्या प्रति दिल्या आहेत. या सर्वांच्या उपस्थितीत सर्व मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here