Newasa : शनिशिंगणापूर कोविड केअर सेंटरला प्रशांत गडाख यांची भेट

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई – नेवासा तालुक्यातील वाढती रुग्णांची संख्या पाहता शंकरराव गडाख यांनी स्वतः पुढाकार घेत शनिशिंगणापूर येथे शनैश्वर ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू केले. यामुळे नेवासा येथील कोविड सेंटरवर असलेला अतिरिक्त ताण दूर होऊन रुग्णांची हेळसांड दूर झाली. शनिशिंगणापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांना दिला जाणारा संतुलित आहार, गरम पाणी, वाफेची सोय यामुळे रुग्णांना समाधान लाभते आहे.
वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता व रुग्णांना अधिक सुयोग्य उपचार मिळावेत. यासाठी प्रशांत गडाख यांनी मंगळ (दि 15 सप्टेंबर 2020) शनिशिंगणापूर येथील कोविड सेंटर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी, डॉ. मोहसीन बागवान ग्रामीण रुग्णालय, डॉ राजेंद्र कसबे, शनिशिंगणापूर ग्रामीण रुग्णालयाचा सर्व स्टाफ यांची एकत्रित मीटिंग घेतली. यामध्ये प्रशांत गडाख यांनी कोरोनाला सामोरे जातांना हॉस्पिटल प्रशासन व आरोग्य विभाग यांनी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या.
आपण सर्व मिळून ही सेवा जबाबदारीने पार पाडू व करोनाशी सामना करू हा आशावाद सर्वांना दिला. तसेच अचानक एखादा रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्याला पुढील उपचारासाठी इतरत्र हलवेपर्यंत जास्त दाबाने ऑक्सिजन मिळावा म्हणून  शंकरराव गडाख यांनी आरोग्य विभागामार्फत एच,एफ,एन,ओ (अत्याधुनिक मशीन) मिळवून दिला आहे. तो येत्या 2 दिवसात येथे टेक्निशियनसह कार्यन्वित होणार आहे. ही माहिती प्रशांत गडाख यांनी यावेळी दिली. तसेच इतर ठिकाणी अत्यावस्थ रुग्ण पाठवताना रस्त्यात त्या रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून त्यासाठी विशेष कॉर्डियाक रुग्णवाहिका ही देवस्थानकडे उपलब्ध आहे.
हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स जाणीवपूर्वक रजा टाकून कर्तव्यात कसूर करत आहेत व कोरोनाच्या काळात कामास टाळाटाळ करत आहेत. त्यांनाही समज देण्याच्या सूचना व्यवस्थापनास दिल्या. यावेळी शनिशिंगणापूर येथील डॉक्टरांशी बोलतांना गडाख म्हणाले की देशासह, राज्यातील डॉक्टर्सनी अगदी प्रामाणिकपणे कोरोना काळात सेवा बजावत असताना शनीशिंगणापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्सनी कामात हलगर्जीपणा करणे हे योग्य नाही. संकटाशी लढताना ज्याच्यावर जी जबाबदारी असते. त्याने ती कर्तव्य म्हणून पार पडलीच पाहिजे.
युद्धभूमीवरील सैनिक युद्ध सुरू झाल्यावर रजेवर जात नाहीत. ते संकटाशी लढतात हाच दृष्टिकोन डॉक्टरांनी स्वीकारला पाहिजे कोविड योद्धा म्हणून लढले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणारे पीपीई किट व इतर सर्व साहित्य पुरवण्याची जबाबदारी प्रशासनामार्फत माझी आहे. डॉक्टरांचा उपयोग फक्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी नसून, त्यांना धैर्य व पाठबळ देणे हा पण आहे. रुग्णांना हाच आधार मिळावा, म्हणून मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या भेटीला आलो आहे, असे सांगत सर्वासमक्ष प्रशांत गडाख यांनी पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत आधार दिला.
यावेळी रुग्णांनी हॉस्पिटलच्या वतीने ज्या सुविधा दिल्या जातात. त्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी गडाख यांनी सर्वत्र फिरून पाहणी करत अधिक स्वच्छतेसंदर्भात योग्य त्या सूचना देत तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले. तसेच रुग्णाचा आत्मविश्वास द्विगुणित होऊन त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी कोरोना सेंटरमध्ये वाय फाय इंटरनेट सुविधा,टेलिव्हिजन,म्युझिक सिस्टीम,अवांतर वाचनासाठी पुस्तके इत्यादी व्यवस्था यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे करण्यास सांगितले.
गेल्या 2  ते 3 दिवसापासून आम्ही शनिशिंगणापूर येथील कोविड सेंटरमध्ये ऍडमिट आहोत येथे भौतिक सुविधा चांगल्या आहेत. पण करोनामुळे आतून खचलो होतो. आज प्रशांत गडाख यांनी प्रत्यक्ष भेट देत आम्हा सर्वांशी आपुलकीने संवाद साधत आधार दिला. यामुळे आम्हा सर्वांना खूप समाधान वाटले. कुटुंबातील व्यक्तीनेच आमची विचारपूस केल्याने आम्ही लवकरच बरे होऊ. आम्हीही बरे झाल्यावर कोरोनाच्या रुग्णांना आधार देऊ.
 – अरविंद लिपाने सोनई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here