Editorial : तुझ्या गळा, माझ्या गळा

आजचा मित्र उद्या शत्रू होऊ शकतो, तर कालचा शत्रू आज मित्र होतो. मैत्रीचे अंतर्प्रवाह बदलत असतात. एक मित्र दूर गेला, की त्याच्याविरोधातील अन्य मित्र जवळ येतात. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जे नवे करार घडवून आणले, त्याने जागतिक राजकारणाची समीकरणेच बदलणार आहेत. जी राष्ट्रे सातत्याने परस्परांचा दुस्वास करीत होती, एकमेकांचे लचके तोडत होती, तीच राष्ट्रे आता तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा करायला लागली आहेत. एक महिन्यापूर्वी ट्रम्प यांनी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये यशस्वी मध्यस्थी करत जवळपास ७२ वर्षांनंतर दोन्ही देशांमध्ये मैत्री संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आता बहरीन आणि इस्रायलमध्ये मैत्री करार झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीनंतर इस्रायलनंतर आता बहरीन या आणखी एका अरब देशाने इस्रायलसोबत मैत्री करार केला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि बहरीनचे किंग हमद बिन इसा अल खलीफा यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी या मैत्री कराराची माहिती जाहीर केली. इस्रायल आणि बहरीनमध्ये आता राजनयिक संबंध निर्माण होणार आहे. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू होणार आहे. त्याशिवाय, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण, सुरक्षा आणि कृषी आदी क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे. हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. आतापर्यंत इस्रायलसोबत मैत्री करण्यास अनेक देश टाळाटाळ करत होते. आता या परिस्थितीत बदल होत असून मैत्री संबंध निर्माण होत आहेत. पश्चिम आशिया अधिक स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध होणार आहे. बहरीन आणि इस्रायलच्या करारावर पॅलेस्टाइनने निषेध केला आहे. हा करार म्हणजे विश्वासघात असल्याचे पॅलेस्टाइनने म्हटले आहे. अर्थात पॅलेस्टाईनकडून वेगळी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. संयुक्त अरब अमिराती-इस्रायलने केलेल्या करारानंतर हा करार म्हणजे पाठित खंजीर खुपसण्यासारखा असल्याचे पॅलेस्टाइनने म्हटले. इराणनेही बहरीनवर टीका केली आहे. यामुळे आता बहरीनही इस्रायलच्या गुन्ह्यात भागीदार होणार असून या भागात सुरक्षिता आणि इस्लाम जगताला हा मोठा धोका असल्याचे इराणने म्हटले. संयुक्त अरब अमिरातीने बहारीन-इस्रायल मैत्री कराराचे स्वागत केले आहे. पश्चिम आशियात आणि जगभरात शांतता निर्माण होणार असल्याचा विश्वास संयुक्त अरब अमिरातीने व्यक्त केला आहे.

संयुक्त अरब अमिराती, बहरीन या देशांनी इस्रायलसोबतच्या मैत्री करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे आता मध्य-पूर्व भागात मैत्री पर्व सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासूनचे वैर विसरून अरब देशांनी इस्रायलसोबत मैत्री करार केला आहे. अमेरिकेची मध्यस्थी याकामी अतिशय महत्त्वाची ठरली. करारावर स्वाक्षरी होताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ट्रम्प यांनी या करारामुळे मध्य पूर्व भागात नवी सुरुवात झाली असून यामुळे आता जगातील अतिशय महत्त्वाच्या भागात शांतता प्रस्थापित होणार असल्याचे सांगितले. अनेक दशकांचा संघर्ष, वादानंतर आता आपण एका नवीन मध्य पूर्व भागाची सुरुवात करत असल्याचे त्यांनी म्हटले. इस्रायल, संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये आता दूतावास सुरू करण्यात येणार असून मित्र देश म्हणून एकत्र काम करणार आहेत.

नेत्यान्याहू यांनी या कराराचे स्वागत करताना म्हटले आहे, की आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस मैत्री पर्वाची नवी पहाट घेऊन येणार आहे, तर पॅलेस्टीनने या करारावर टीका केली आहे. पॅलेस्टाइनच्या भूमीवरील अवैध ताबा इस्रायल सोडून देत नाही, तोपर्यंत मध्य पूर्व भागात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता निर्माण होणार नसल्याचे पॅलेस्टीनचे नेते महमूद अब्बास यांनी सांगितले. इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये सुरू असलेल्या वादात अरब देशांनी आतापर्यंत पॅलेस्टिनच्या पाठिंब्यासाठी इस्रायलसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले नव्हते. आता मात्र, बदललेल्या परिस्थितीनंतर संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलसोबत हातमिळवणी केली आहे. त्यानंतर बहरीननेदेखील इस्रायलसोबत मैत्री केली. संयुक्त अरब अमिरातीनंतर सौदी अरेबियादेखील इस्रायलसोबत मैत्री करू शकतो अशी चर्चा होती; मात्र पॅलेस्टाइनसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त शांतता करारावर इस्रायलने स्वाक्षरी करण्याची अट सौदी अरेबियाने ठेवली आहे.

जोपर्यंत इस्रायल पॅलेस्टाइनसोबत शांतता करारावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी राजनयिक संबंध प्रस्थापित करता येणे अशक्य आहे. बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीने केलेल्या कराराचा पॅलेस्टाइनने निषेध केला आहे. हा करार म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखे असल्याचे पॅलेस्टाइनने म्हटले. संयुक्त अरब अमिरातीनंतर बहरीननेही इस्रायलसोबत करार केल्यानंतर इराणने बहरीनवर टीका केली. आता बहरीनही इस्रायलच्या गुन्ह्यात भागीदार होणार असून या भागात सुरक्षिता आणि इस्लाम जगताला हा मोठा धोका असल्याचे इराणने म्हटले. इस्रायलसोबत अरब देशांकडून मैत्री करार होत असल्यामुळे जागतिक राजकारणावरही याचे पडसाद उमटणार आहेत. संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, बहरीन आणि येमेन आदी शेजारील देश इराणमुळे चिंतेत आहेत. या देशांना इराणच्या वाढत्या ताकदीची भीती वाटत आहे. त्यामुळेच इस्रायलसोबत मैत्री करून हे देश इराणची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणदेखील चीन व तुर्कीसोबत मैत्री करून आपली ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीत झालेला करार भारताच्याही फायद्याचा ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ज्ञ कमर आगा यांनी सांगितले, की इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीने इराणच्या वाढत्या धोक्याला लक्षात घेऊन एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. इराण आणि चीन दरम्यान करार झाला, त्याला प्रत्युत्तर म्हणून या कराराकडे पाहता येईल. संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाला इस्रायलची आवश्यकता भासत आहे. त्याच वेळी हे दोन्ही देश पाकिस्तानपासून दूर होत आहेत. येमेनच्या लढाईत सौदी अरेबिया वाईट पद्धतीने फसले आहे. पाकिस्तानी लष्कराची मदत घेऊनही ही लढाई संपली नाही. हैतीच्या लढाईल इस्रायल सौदी अरेबियाची मदत करत आहे. इतकेच नाही, तर इस्रायल इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीची मदत करू शकतो. येत्या काळात सौदी अरेबिया ही इस्रायलसोबत मैत्री करू शकतो. पाकिस्तानवर काही बाबतीत असलेले अवलंबत्व सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात कमी करत आहे.

सौदी अरेबियात मोठ्या संख्येने पाकिस्तानी लष्कर आहे. आता या करारानंतर हे सैन्य टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी इजिप्त आणि सुदानचे सैन्य हैती बंडखोरांविरोधात लढण्यासाठी सौदीत दाखल होत आहेत. इस्रायलकडून या सैनिकांना प्रशिक्षण आणि इतर मदत मिळण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील ताणले गेलेले संबंध इस्रायलच्या पथ्यावर पडणार आहे. कोरोना पश्चात काळात जागतिक परिस्थिती बदललेली अेल. अमेरिका आखातात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्याच्या स्थितीमध्ये नाही. त्यामुळे पश्चिम आशियात इस्रायलने अमेरिकेची भूमिका बजवावी अशी अमेरिकेची इच्छा आहे.

लिबीयामध्ये संयुक्त अरब अमिरातीचे मोठे नुकसान होत आहे. संयुक्त अरब अमिरातीचे समर्थक असणारे खलीफा हफ्तार लढाई हारत आहेत. लिबीया सरकारला तुर्कस्थानकडून पाठिंबा मिळत आहे. आता, संयुक्त अरब अमिरातीला अत्याधुनिक शस्त्रे असणाऱ्या इस्रायलची साथ मिळण्याची शक्यता आहे. भारताचे अरब आणि इस्रायलसोबत चांगले संबंध आहेत. भारतात कच्चे तेल आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीत शांतता राहावी, अशी भारताची इच्छा आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे संबंध तुटल्यास भारताला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे भारताला आर्थिक आणि रणनीतिक फायदा होणार आहे. सौदी अरेबियात भारताचा प्रभाव आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. इस्रायल-संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या कराराचे परिणाम फक्त पश्चिम आशियापर्यंत मर्यादित राहणार नसून युरोप, आफ्रिका आदी देशांवर परिणाम होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here