Beed : जिल्ह्यात ऑक्सिजन सुविधा असणारे 907 तर व्हेंटिलेटरची सुविधा असणारे 185 बेड उपलब्ध

बीड जिल्हा वासीयांनो घाबरू नका, काळजी घ्या – धनंजय मुंडे
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेचा नुकताच आढावा घेतला. पुणे – मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याची ओरड असताना बीड जिल्ह्यातील व्यवस्थापन व नियोजनामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचे 907 तर व्हेंटिलेटरचे १८५ बेड उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्टिंग, स्वॅब व अन्य माध्यमातून तपासण्या वाढविण्यात आल्या असून, आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. उपलब्ध बेडच्या संदर्भात नागरिकांनी संभ्रम बाळगू नये, तसेच आजाराची लक्षणे दिसताच स्वतःहुन कोविड तपासणी करून घ्यावी, असे आवाहन बैठकीनंतर मुंडे यांनी जिल्हा वासीयांना केले.
बुधवार (दि. १६) रोजी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपलब्ध बेडची संख्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ची वर्गवारी सहित माहिती घेतली.  नागरिकांमधील संभ्रम दूर करण्याबाबत निर्देश दिले, तसेच रुग्णालय निहाय उपलब्ध बेड संख्या, रुग्ण संख्या तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज ‘डॅशबोर्ड’ स्वरूपात प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला केल्या आहेत.
बीड जिल्हा रुग्णालय व अन्य कोविड सेंटर मिळून बीड येथे ऑक्सिजनचे ८० व व्हेंटिलेटरचे ५०, अंबेजोगाई स्वाराती येथे ऑक्सिजनचे १९६ व व्हेंटिलेटरचे ५२, अंबाजोगाई महिला रुग्णालय येथे ऑक्सिजन ५१ व व्हेंटिलेटर ६०, जेरिऍट्रिक कोविड रुग्णालय अंबाजोगाई येथे ऑक्सिजन ५०० व व्हेंटिलेटर १४ आणि गेवराई रूग्णालयात ऑक्सिजन ३० तर व्हेंटिलेटर १० असे एकूण ऑक्सिजन बेड 907 तर व्हेंटिलेटर बेड १८६ उपलब्ध आहेत.
जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तसेच अँटिजेन टेस्टिंग व स्वॅब आदी माध्यमातून आढळणारे रुग्णांचे प्रमाण यांचा समतोल राखत आवश्यकता भासल्यास आणखी खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात येईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here