Kada : कोरोना बाधित रूग्णाने धुंदीत धूम ठोकली

0
मदतीला नातेवाईक आले ना ग्रामसुरक्षा समिती, शोधार्थ आरोग्य विभागाने रात्र काढली

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

वटणवाडी परिसरातील पंचेचाळीस वर्षीय कोरोना बाधित रूग्ण बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आढळून आला. त्यास उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णवाहिका आली. परंतू धुंदीत असलेल्या रूग्णाने अचानक धूम ठोकल्याने आरोग्य विभागाची पुरती भंबेरी उडाली. त्या रुग्णाच्या शोधार्थ आरोग्य कर्मचा-यांनी रात्र घालवली. मदतीला ना नातेवाईक आले ना ग्रामसुरक्षा समिती हा धक्कादायक प्रकार कड्यात काल मध्यरात्रीपर्यंत पाहावयास मिळाला आहे.

आष्टी तालुक्यात सध्या काही शहरांसह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आढळून येऊ लागल्याने प्रशासन देखील हतबल झाले आहे. सामान्य नागरिक देखील दिवसेदिवस कोरोनामुळे उद्भवणा-या परिस्थितीकडे फारसं गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास वटणवाडी परिसरातील पंचेचाळीस वर्षीय एक पुरूष पॉझिटीव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच, त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी रूग्णालयातून रुग्णवाहिका पाठवण्यात आली.

त्यासोबत आरोग्य अधिकारी, कर्मचारीही होते. विशेष म्हणजे तो रुग्ण धुंदीत कडा परिसरात फिरत असल्याचेही समजले. याबाबत नातेवाईक अन् स्थानिक ग्रामसुरक्षा समितीला माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतू आरोग्य कर्मचा-याच्या कुणीच मदतीला धाऊन आले नाही. त्यामुळे त्या धुंदीत पाॅझिटिव्ह रुग्णाच्या शोधार्थ आरोग्य विभागाने अख्खी रात्र जागून काढली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

मात्र, धुंदीत रुग्णाने कुठे धुम ठोकली हे दुस-या दिवशी उशिरापर्यंत समजले नाही. त्यामुळे तो नेमका कुणाच्या संपर्कात आला, कुणा कुणाला भेटला, कुठं थांबला याचा, शोध घेणे प्रशासनासाठी डोकेदुखी झाली आहे. यामुळे आता मोठा मनस्ताप होणार असल्याचे दिसून येते. केवळ सहकार्य मिळत नसल्यामुळे बाधित रूग्ण धुम ठोकत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. तर आरोग्य विभागाला नातेवाईक, ग्राम सुरक्षा समितीचे कसलेच सहकार्य मिळत नसल्याने कोरोनाचा प्रश्न डोकेदुखी ठरण्याची शक्यता आष्टी तालुक्यात निर्माण झाली आहे.
तालुक्यातील वटणवाडी परिसरातील कोरोना बाधित रूग्ण कड्यात फिरत असल्याची माहिती मिळताच, आरोग्य विभागाचचे वाहन त्याचा शोध घेण्यासाठी रात्रभर फिरले. मात्र आरोग्य विभागाला नातेवाईक, ग्रामसुरक्षा समितीचे सहकार्य न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकांनी आम्हाला सहकार्य केले नाही तर भविष्यात धोकादायक चित्र उदभवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चिंता कडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ नितीन मोरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
समितीच्या दिमतीला पोलीसांची गरज 
गावपातळीवर ग्रामपंचायत निहाय कोरोनाला अटकाव करण्यासाठी ग्राम सुरक्षा समितीची ठिकठिकाणी नेमणूक झाली. परंतू समितीच्या सदस्यांचे आरोग्य विभागाला सहकार्य लाभत नसल्यामुळे काही बाधित रूग्णांसह सुज्ञ नागरिकही आडमुठापणाचे प्रदर्शन करीत आहेत. त्यामुळे ग्रामसुरक्षा समितीच्या दिमतीला आता पोलिसांची मदत आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here