Karjat : पत्रकार विमा योजना तातडीने लागू करण्यात यावी; तालुका पत्रकार संघ

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १८

कर्जत : महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतरही राज्यातील कोरोना बळी पत्रकारांच्या कुटुंबीयांना ना पन्नास लाखांची मदत मिळाली ना पत्रकार विमा योजना सुरू केली गेली. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असून तो व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी, (दि १८) राज्यातील पत्रकार आरोग्य मंत्र्यांना हजारो एसएमएस पाठवून आपला संताप व्यक्त करणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेने या आंदोलनाची हाक दिली होती. या अनुषंगाने कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसिलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना “कोरोना योद्धे” असलेल्या पत्रकाराचं कोरोनानं निधन झालं तर त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, राज्यात आतापर्यंत २५ पत्रकारांचे बळी कोरोनानं घेतले असले तरी एकाही पत्रकाराच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची काय दमडीची ही मदत सरकारकडून मिळाली नसल्याने पत्रकारांमध्ये मोठा संताप आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुका पत्रकार संघाच्यावतीने कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना तातडीने लागू करावी, पत्रकारांसाठी प्रत्येक रूग्णालयात ऑक्सीजन, व्हेंटीलेटरसह त्वरीत बेड उपलब्ध करण्यात यावे आणि यात ग्रामीण भागातील पत्रकारांचाही समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन कर्जतचे तहसिलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.
यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना पठाण, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे, उपाध्यक्ष मोतीराम शिंदे, कार्यध्यक्ष निलेश दिवटे,सचिव मच्छिंद्र अनारसे, खजिनदार डॉ अफरोजखान पठाण, सल्लागार सुभाष माळवे, आशिष बोरा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here