Sangamner : इंदोरीकर महाराज खटला प्रकरणी पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला…

ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या विरोधात दाखल खटल्यात अंनिसच्या वतीने अ‍ॅड.रंजना गवांदे लेखी स्वरूपात बाजू मांडणार; पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला….

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ऐच्छिक संतती प्राप्तीसाठीचे वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरुन निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर आज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन अंनिसच्या वतीने अ‍ॅड.रंजना गवांदे यांना लेखी स्वरुपात बाजू मांडण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार आहे.

ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी सम तिथीला स्त्रीसंग झाल्यास पुत्रप्राप्ती होते, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करीत अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्या जिल्हाकार्याध्यक्षा अ‍ॅड.रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसह कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरीक्त उपसंचालकांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत 26 जून ला संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भंवर यांनी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या विरोधात देशमुख यांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

जिल्हा व सत्र न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देत सुरुवातीला 7 नंतर 22 ऑगस्ट ला यावर सुनावणी घेतली. या 22 सुनावणीच्या वेळी अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षा अ‍ॅड.रंजना गवांदे यांनी या खटल्यात सरकार पक्षासोबत आपल्याला ही  बाजू मांडण्याची संधी मिळावी अशी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेच्या सुनावणीसाठी 16 सप्टेंबरची तारिख दिली.

या याचिकेवर बचाव पक्षांच्या वकीलांनी आक्षेप घेतल्याने न्यायालयाने 18 सप्टेंबर तारीख दिली होती आज या याचिकेवर न्यायालयात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने अंनिसच्या वतीने अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका मंजूर केली. व त्यांना या खटल्यात लेखी स्वरुपातच म्हणणे सादर करता येईल, अशी अट टाकली. त्यामुळे याखटल्यात पुढील सुनावण्यांमध्ये आता सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिलांसह अ‍ॅड.रंजना गवांदे तर बचाव पक्षावतीने अ‍ॅड.के.डी.धुमाळ कायद्याची बाजू मांडणार आहेत.

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) हे आपल्या किर्तनातून समाजातील अनिष्ट रुढी व परंपरा, बदलते भौतिक जीवन, परंपरा, संस्कार यावर भाष्य करतात त्यावेळी ते संत साहित्यातील दाखलेही देतात. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी सम आणि विषम तिथीतून कशा पद्धतीने ऐच्छिक संतती प्राप्त होते याचे उदाहरण दिले होते. त्यासाठी त्यांनी हिंदु धर्माच्या पौराणिक ग्रंथांचा दाखला दिला होता. मात्र, त्यांचे वक्तव्य गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे (पीसीएनडीटी) उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत संगमनेरच्या न्यायालयात गुन्हा दाखल झाला. तो रद्द करण्यासाठी देशमुख यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे, त्यावर दोन्ही बाजूंनी सुनावनी सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here